प्रिया दत्त यांची काँग्रेस सचिवपदावरून हकालपट्टी

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त यांच्या नावाची लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा करण्यात आली असली तरी काँग्रेसने मात्र त्यांना जोरदार झटका दिला आहे. प्रिया दत्त यांना अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सचिवपदावरून हटवण्यात आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली. अशोक गेहलोत यांनी प्रिया दत्त यांना २६ सप्टेंबर रोजीच पत्र पाठवून त्यांना सचिवपदावरून हटवण्यात येत असल्याचं कळवलं आहे. मात्र सचिव म्हणून दत्त यांनी केलेल्या कार्याचीही या पत्रात प्रशंसा करण्यात आली आहे. शिवाय भविष्यात त्यांची पक्षाला गरज भासणार असल्याचंही म्हटलं आहे.

दरम्यान, रविवारी उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यावेळी निरुपम यांनी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून दत्त यांच्या नावाची घोषणा केली. मात्र त्यांच्या नावाची घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्याने त्याला विरोध करत जोरदार गोंधळ घातला. या कार्यकर्त्यांनी प्रिया दत्त यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निरुपम यांना घेराव घातला. २०१४ पासून दत्त या मतदारसंघात फिरकल्या सुद्धा नाहीत. असं असताना त्यांच्या नावाची घोषणा कशी करता? असा सवाल करत या कार्यकर्त्यांनी निरुपम यांचा रस्ता रोखून धरला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत