प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…… 

आज महाराष्ट्र दिन ..  कवी राजा बढे यांनी रचलेल्या

मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा !

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा 
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा.

 

या ओळी तमाम मराठीजनांना कमालीची ऊर्जा देतात. हुतात्म्यांच्या बलिदानातून 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. याच दिनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि म्हणून आपण सारे मराठीजन आणि महाराष्ट्रवासी मोठ्या अभिमानाने हा दिन साजरा करतो.

भारतभूमीच्या नकाशावर महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा खूप मोठा आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विकासातही महाराष्ट्राचे योगदान हे अनन्यसाधारण असे आहे. या महाराष्ट्राच्या मातीला साधुसंतांनी पावित्र्याचा वसा दिला. संत, ऋषिमुनी आणि महंतांनी नेहमीच या भूमीबद्दल गौरवोद्‌गार काढलेले आहेत.
माझा मऱ्हाटाचि बोल कवतुके। परी अमृतातेंहि पैजा जिंके। 
ऐसी अक्षरे रसिकें । मेळवीनस या अभंगातून संत ज्ञानेश्‍वरांनी महाराष्ट्राच्या मायबोलीचे माधुर्य वर्णिले आहे.
तर दुसरीकडे याच मातीसाठी रक्त सांडून येथील शूरवीरांनी या मातीला त्यागाचा आणि पराक्रमाचा वारसा दिला. जगातील सर्वोत्कृष्ट योद्धा आणि उत्तम शासक असणाऱ्या छत्रपती शिवरायांनी या मातीला एक नवा इतिहास दिला. अठरापगड जातीजमाती, बलुतेदार, अलुतेदार यांची एकसंघ मोट बांधून हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले आणि पुढे यातूनच प्रेरणा घेऊन अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी अखंड महाराष्ट्राचा पाया रचला.

अनेक सामान्य व्यक्तिमत्त्वांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्र भूमीला एक शक्तिस्थान म्हणून उदयास आणले. साहित्याचा विचार केल्यास संतांचे अभंग, भारुडे, श्‍लोक, ओव्या आणि ग्रंथपरंपरेने खऱ्या अर्थाने इथल्या साहित्याचा वारसा संपन्न केला. यातच पुढे अनेक कवी, लेखक साहित्यिकांनी आपल्या लिखाणाने साहित्य परंपरा अबाधित राखली. येथील कलाकारांनी लावणी, लोक गीते, कोळी गीत, नाटके, चित्रपट आणि अभिनयाने रंगभूमीला समृध्द केले. खाशाबा जाधव, गावसकर, तेंडुलकर, धनराज पिल्ले यांसारख्या खेळाडू लढवय्यांनी महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला जगभरात प्रसिद्ध केले.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीप्रधान देशाला राज्यघटना दिली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यापासून ते कर्मवीर भाऊराव पाटलांपर्यंत अनेक समाजसुधारकांनी शिक्षणगंगा घरादारात पोहोचवली. अनेक कर्तुत्वान उद्योजक, राजकीय व सामाजिक व्यक्तिमत्त्वे, महिलावर्ग, युवक आणि आबालवृद्धांनी या महाराष्ट्राच्या शिरपेचात अनेक मनाचे तुरे रोवले आहेत. महाराष्ट्राने आजतागायत राजकीय, सामाजिक साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रांत नेत्रदीपक भरारी घेतली आहे. म्हणूनच आता खऱ्या अर्थाने आपली भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या पूर्वजांनी महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची, त्यागाची आपल्याला जाणीव ठेवायची आहे . त्यांनी दिलेला वैभवशाली वारसा जपत प्रगतीची उंचउंच शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करायचा आहे.
आपल्याला महाराष्ट्रभूमी लाभली याचा सार्थ अभिमान वाटतो आणि या भूमीला उद्देशून आवर्जून म्हणावेसे वाटते की,

बहूअसोत सुंदर संपन्न कि महा

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा …

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत