प्रीतम मुंडेंबद्दल अनुद्गार काढल्याचा आरोप, शिक्षकाला बेदम मारहाण

पुणे : रायगड माझा वृत्त 

आमदार राम कदमांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून एका शिक्षकाने भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याबद्दल सोशल मिडीयावरून आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे त्याला चक्क फेसबुक लाईव्ह करुन बेदम मारहाण केली आहे. संजय कुऱ्हाडे असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव असून ते कॅम्प एज्युकेशनच्या शाळेमध्ये कार्यरत आहेत. रविवारी दुपारी निगडी येथील निवेदिता बँकेसमोर मुंडे समर्थक गणेश कराड आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गणेश कराडसह पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सोशल मिडीयातूनही संतापाचा भडका उडाला आहे. सोशल मिडीयातील हे ‘वॉर’ आता हिंसक होऊ लागले आहे. राम कदम यांच्या निषेधार्थ केलेल्या पोस्टमध्यये कुऱ्हाडे यांनी प्रीतम मुंडे देखील अविवाहित असल्याची टिप्पणी सोशल मीडियावर केली होती. याच कारणावरुन रविवारी दुपारी मुंडे समर्थक गणेश कराड आणि त्याच्या साथीदारांनी कुऱ्हाडे यांना निगडीच्या निवेदिता बँकेसमोर बोलावून फेसबुक लाईव्ह सुरू करुन केलेल्या पोस्ट बद्दल माफी मागायला लावली आणि मग शिवीगाळ करत लाथा – बुक्यांनी मारहाणही केली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी गणेश कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या मारहाण प्रकरणी निगडी पोलीसांची भुमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे. मुंडे समर्थकांनी संजय कुऱ्हाडे यांना मारहाण करताना त्याचे ‘फेसबुक’वरून थेट प्रक्षेपण केले. रविवार दुपारपासूनच याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर ’व्हायरल’ झाला. प्रसारमाध्यमांनीही त्याची दखल घेत बातम्या चालविल्या. मात्र, निगडी पोलीसांना या घटनेचे कोणतेच सोयरसुतक नव्हते. शिक्षकाला मारहाण केल्याची घटना घडूनही राजकीय दबावापोटी कोणतीही ठोस कारवाई न करता निगडी पोलीसांनी केवळ बघ्याची भुमिका घेतल्याचा आरोप होत आहे. याबाबत निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधूनही त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी निगडी पोलीसांवर मोठा दबाव असल्याचे दिसून येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत