प्रेमाच्या त्रिकोणातून पत्नीचा खून; बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

मुंबई : रायगड माझा वृत्त 

एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच्या अनैतिक संबंधांमुळे पतीने पेशाने शिक्षिका असलेल्या पत्नीचाच काटा काढला आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या पतीसह अभिनेत्री आणि तिच्या वडीलांनाही अटक करण्यात आली आहे.

दिल्लीतील बवाना नावाच्या गावात घरापासून 7 किमीवर सोमवारी शिक्षिका सुनीता हीचा खून झाला होता. मात्र, त्याचे धागेदोरे मुंबईत बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवायला आलेल्या अभिनेत्री अँजेल गुप्ताशी जोडले गेल्याने पोलिसही चक्रावले होते. या खून प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांना सुनिताच्या डायरीमध्ये आणि मोबाईल सीडीआरमध्ये सापडले.

सुनिताच्या खूनाचा कट तिचा पती मंजीत, त्याची प्रेमिका आणि अभिनेत्री अँजल गुप्ता व तिच्या मानलेल्या उद्योगपती वडीलांनी रचला होता. मंजीतनेही मॉडेल म्हणून मुंबईमध्ये आपले नशीब आजमावले होते. पोलिसांनुसार सध्या मॉडेलिंगच्या दुनियेमध्ये अँजेल गुप्ता नावाने ओळखली जाणारी मॉडेल आणि अभिनेत्री शशी प्रभा ही मूळची उत्तर प्रदेशमधील राहणारी आहे. तिची आई दिल्लीतील सीपीडब्ल्यूमध्ये काम करते. तिच्या वडिलांचे खूप वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

शशी प्रभा ही बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईमध्ये आली होती. मॉडेलिंग नंतर ती थ्री पार्टीची सेलिब्रिटी बनली. तिचे मानलेले वडील राजीव गुप्ता हे उद्योगपती आहेत. दिल्लीतील रोहिणी सेक्टर 3 मध्ये राहतात. अँजेल म्हणजेच शशी प्रभाच्या मुंबईतील अलिशान फ्लॅटचे 50 हजारांचे भाडे राजीव गुप्ताच भरतात.

तर मंजीत हा मालमत्ता विक्री आणि अन्य धंद्यांमध्येही काम करत होता. गुडगावमध्ये एका हॉटेलमध्ये त्याची आणि अँजेलची ओळख झाली होती. दोघांनाही मॉडेलिंगचे आकर्षण असल्याने त्यांची मैत्री वाढत गेली. प्रेमात रुपांतर झाल्यानंतर दोघेही लग्न करण्यास इच्छुक होते. मात्र, मंजीतचे सुनिताशी लग्न झालेले होते. तरीही अँजल आणि मंजीतने लग्न केले. यासाठी राजीव गुप्ता याने मदत केली. लग्नानंतर मंजीतची अधिकृत पत्नी सुनिता त्यांच्यात अडचण ठरत होती. तिला या लग्नाबाबत समजल्यानंतर मंजीतशी भांडणे होऊ लागली. यातूनच सुनिताचा काटा काढायचे ठरले आणि भाडोत्री गुंडांकडून सोमवारी सुनिताची हत्या करण्यात आली.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत