फर्जंद’ला मुंबईत प्राईम टाईम नाही; मनसेचा आंदोलनाचा इशारा

मुंबई : रायगड माझा 

‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाला मुंबई एकही प्राईम टाईम शो न दिल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. चित्रपटाला तात्काळ प्राईम टाईम म्हणजेच संध्याकाळच्या वेळेत शो न दिल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

‘फर्जंद’ हा शिवाजी महाराजांच्या मावळ्यावर आधारित ऐतिहासिक चित्रपट शुक्रवारी 1 जून रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे मुंबईतील चित्रपटगृहात 90 खेळ होत असून, ते सर्व सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत होत आहेत. या प्रकारामुळे नाराज झालेल्या ‘फर्जंद’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याकडे धाव घेतली. या चित्रपटाला मुंबईत प्राईम टाईमचा शो नसल्याचा मनसेकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

चित्रपटाला तात्काळ प्राईम टाईममध्ये शो दिले नाहीत, तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संबंधित पत्र मनसे लवकरच सर्व थिएटरला पाठवणार आहे. सध्या राझी, परमाणू आणि वीरे दी वेडिंग हे तीन हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला कमवत आहेत. याच चित्रपटांसाठी मराठी सिनेमाला हक्काची वेळ नाकारल्याचं म्हटलं जात आहे.

कोंडाजी फर्जंद या शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यावर या सिनेमाच्या कथा आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, नेहा जोशी, निखिल राऊत, समीर धर्माधिकारी यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. दिग्पाल लांजेकरने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून अनिर्बन सरकारने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत