फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो एकाच वेळी दोन महिलांशी लग्न करणार!

रायगड माझा वृत्त

फुटबॉलच्या मैदानावर आपल्या खेळाने क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रोनाल्डिनो हा खेळाडू आता आणखी एका कारणामुळे प्रकाशझोतात आला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारलेला हा स्टार फुटबॉलपटू एकाच वेळी त्याच्या दोन्ही प्रेयसींशी विवाहबंधनात अडकणार आहे. प्रिसीलिया कोएल्हो Priscilla Coelho आणि बिट्रीझ सोझा Beatriz Souza या दोन्ही प्रेयसींसोबत सहजीवनाची शपथ घेण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

दोन बायका एकत्र आल्यावर सहसा त्यांना ‘सवत’ म्हणून संबोधण्यात येतं आणि त्यांच्यातील नातंही तितकं सहज नसल्याचं सांगितलं जातं. पण, रोनाल्डिनोच्या बाबतीत मात्र तसं नाहीये. कारण, या दोन्ही प्रेयसी त्याच्यासोबत अगदी आनंदात राहात असून, त्यांच्यात कोणताच वाद नसल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे विविध ठिकाणी दौऱ्यांवर गेलेला रोनाल्डिनो आपल्या दोन्ही प्रेयसींसाठी एकसारख्याच भेटवस्तू आणतो असं वृत्तही ब्राझीलच्या स्थानिक वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलं आहे.

दरम्यान, रोनाल्डिनोच्या या निर्णयाचीच सध्या सोशल मीडिया आणि क्रीडाविश्वात बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. रोनाल्डिनोचा हा निर्णय त्याच्या बहिणीला मुळीच पटला नसून, ती या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. असं असलं तरीही रोनाल्डिनोच्या चाहत्यांच्या वर्तुळात सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात एका अत्यंत खासगी सोहळ्यामध्ये रोनाल्डिनो त्याच्या दोन्ही प्रेयसींसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त ब्राझीलच्या ‘ओ`डिया’ या वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. इकतच नव्हे तर यंदा पार पडणाऱ्या रिओ कार्निव्हलचा आनंदही तो आपल्या दोन्ही पत्नींच्या साथीने घेणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.