फेरीवाल्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारच – संजय निरुपम

( रायगड माझा ऑनलाईन टीम )

मुंबई – सध्या मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्यावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांच्या विरोधात तर काँग्रेसने फेरीवाल्याच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी पुन्हा एकदा फेरीवाल्यांची बाजू उचलून धरली. फेरीवाल्यांच्या पोटाचा विचार करण्याचे त्यांनी आवाहन केले.
50 वर्ष जुन्या फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यास त्यांनी सांगितले. पोलीस, महापालिकेच्या कारवाईविरुद्ध आवाज उठवणारचं असे त्यांनी सांगितले. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाणे आणि मुंबईतील विविध रेल्वे स्थानकत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलन करुन फेरीवाल्यांना हाकलले होते.
राज ठाकरेंच्या फेरीवालाविरोधी भूमिकेनंतर संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची बाजू उचलून धरली. मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही धंदा करु द्यावा यासाठी संजय निरुपम यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. फेरीवाल्यांना मुंबईसह राज्यभरात त्यांच्यासाठी आखून दिलेल्या फेरीवाला क्षेत्रातच आपला व्यवसाय करता येईल असे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले. रेल्वे स्थानकापासून 150 मीटर अंतरावर फेरीवाले बसू शकत नाही हे न्यायालायने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत