फोन चार्जरमधून तरुणींचे काढले अश्लील व्हिडीओ , घरमालकाला अटक

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये, हॉस्टेलवर किंवा पेईंग गेस्ट म्हणून एखाद्याच्या घरात राहत असाल तर सावधान! कारण तुमचे खासगी क्षण कुणीतरी चोरून पाहत असण्याचीही शक्यता आहे. आणि त्यासाठी इलेक्ट्रिक प्लग, फॅन रेग्युलेटर, टेबल क्लॉक, बल्ब किंवा मोबाईल चार्जरसारखे दिसणारे छुपे कॅमेरे बाजारात आले आहेत. त्याचाच वापर करून मुंबईतल्या घरात भाड्याने राहणाऱ्या तरुणींचे खासगी क्षण रेकॉर्ड करणाऱ्या एका विकृत घरमालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे जवळपास दीड वर्षांपासूनचे व्हिडीओ सापडले आहेत.

या 47 वर्षीय आरोपीचं घर दक्षिण मुंबई भागात आहे. त्याच्या घरी गेल्या काही काळापासून तीन तरुणी भाड्याने राहतात. काही काळापासून आरोपी तरुणींच्या संभाषणातील वाक्यं अगदी जशीच्या तशी म्हणून दाखवायला लागला. आधी तरुणींना वाटलं की कदाचित संभाषणाचा आवाज मोठा असल्याने त्याच्यापर्यंत आवाज ऐकू जात असावा. मात्र, त्यातील एका तरुणीला घरात एक इलेक्ट्रिक अडाप्टर लावलेला दिसला. त्यामुळे तिला संशय आला. तिने त्यावर एक कपडा टाकून त्याला झाकून टाकलं. त्यानंतर लगेचच घरमालकाने घरात येऊन अडाप्टर झाकण्याविषयी विचारणा केली. अडाप्टर आपल्या घरातील टीव्हीचा बुस्टर असल्याचं सांगत त्याने तो न झाकण्याविषयी सूचना केल्या.

त्यामुळे त्या तरुणींचा संशय बळावला. त्यांनी त्या अडाप्टरचा फोटो काढून इंटरनेटवर शोधलं. तो अडाप्टर नसून छुपा कॅमेरा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि त्वरित आरोपीला अटक केली. अडाप्टरमधील छुपा कॅमेराही पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यात सुमारे दीड वर्षांपूर्वीची फुटेज सापडली आहेत. त्यामुळे आरोपीने यापूर्वी तिथे राहणाऱ्या भाडोत्रींचे व्हिडीओ बनवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत