बँक अधिकार्‍याची शेतकर्‍याच्या पत्‍नीकडे पीककर्जाच्या मंजूरीसाठी शरीरसुखाची मागणी

मलकापूर: रायगड माझा

एका बँक अधिका-याने शेतक-याच्‍या पत्‍नीकडे पीक कर्ज मंजूर करून देण्‍यासाठी शरीरसुखाची मागणी केल्‍याचा संतापजनक प्रकार मलकापूर येथे घडला असून याप्रकरणी येथील दाताळा गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्‍या शाखाधिका-याविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. एकीकडे शेतक-यांच्‍या नापिकी, वाढते कर्ज यामुळे आत्‍महत्‍या वाढत असताना बँक अधिका-याच्‍या अशा घृणास्‍पद आणि असंवेदनशील कृत्‍यामुळे संताप व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिक कर्जासाठी गावातीलच सेंट्रल बँकेच्‍या शाखेत दाताळा गावातील शेतकरी गुरूवारी गेले होते. शेतक-याची कागदपत्र तपासून बँक व्‍यवस्‍थापकाने त्‍यावेळी तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली. शेतक-याने यावर आपल्‍या पत्‍नीचा नंबर त्यांना दिला. नंतर या नंबरवर शाखाधिका-याने फोन करून शेतकरी पत्‍नीशी अश्‍लील संभाषण केले व शरीर सुखाची मागणी केली. एवढेच नव्‍हे तर यासाठी पिककर्जासोबत वेगळे पॅकेजही देण्‍यात येईल, असा निरोप शाखाधिका-याने शिपायामार्फत महिलेला पाठविला.

महिलेने हे सर्व संभाषण मोबाईलमध्‍ये रेकॉर्डिंग करून ठेवले होते. त्‍यांनी त्‍यानूसार मलकापूर ग्रामीण पोलिसात गुरूवारी याविषयी तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत गुरूवारी रात्री शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्‍हाण यांच्‍याविरोधात विविध कलमांतर्गत तसेच अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल केला. दोन्‍हीही आरोपी गुन्‍हा दाखल होताचा फरार झाले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत