बंडखोर नगरसेवकांचा अंतिम निकालाकडे संपूर्ण माथेरानकरांचे लक्ष ! उद्या होणार अंतीम सुनावणी..!

दिनेश सुतार,माथेरान
 माथेरान नगर परिषदेतील शिवसेनेच्या  नऊ आणि एक स्विकृत असे एकूण दहा नगरसेवकांनी २७ मे रोजी शिवसेनेशी दगा फटका करत भाजपात प्रवेश केला होता. यामुळे गेल्या काही महिन्यापासून माथेरानचे राजकारण चांगलेच तापलेले दिसले होते. या घटनेमुळे शिवसेनेला देखील मोठा राजकीय फटका बसला होता.सदर प्रकरणात शिवसेनेकडून  देखील या बंडखोरांना शिक्षा देण्याकरिता आक्रमक पवित्रा घेतला होता.शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर या बंडखोर नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली गेली होती.
 यासाठी २७ मे रोजी शिवसेना पक्षाचे सचिव अनिल देसाई तसेच माथेरान शिवसेना गटनेते प्रसाद सावंत यांनी देखील रायगडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे या दहा बंडखोर नगरसेवकांच्या विरोधात पत्र सादर केले होते. या अनुषंगाने 21 जून रोजी या सर्व नगरसेवकांना आपले म्हणणे मांडण्या करिता नोटिसा बजावुन दिनांक 30 जून रोजी सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. यानंतर पुन्हा ५ जुलै रोजी माथेरान शिवसेना गटनेते प्रसाद सावंत यांनी  दहा नगरसेवकांच्या विरोधात प्रत्येकी ६ (१) च्या नियमानुसार जिल्हाधिकार्यांकडे सबळ पुराव्यानिशी याचिका दाखल केली होती.मध्यंतरी मा. जिल्हाधिकार्यांच्या बदलीमुळे फास्टट्रॅक वर असलेल्या  या प्रकरणाचा निकाल मंदावल्याने या दहा बंडखोर नगरसेवकांना थोडा दिलासा मिळाला होता.
मात्र काही महिन्यांपूर्वी रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेले डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी या प्रकरणाची चौकशी करून यावर दृष्टिक्षेप टाकल्याने अनेक महीन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर २६ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार असल्याचे मा.जिल्हाधिकार्यांनी जाहीर केल्याने काही महीन्यांवर होऊ घातलेल्या माथेरान नगरपरीषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाचा निकाल महत्वाचा असुन सदर प्रकरणाचा निर्णय या बंडखोर नगरसेवकांच्या किंवा शिवसेनेच्या नक्की कोणाच्या बाजुने लागणार ? हे पाहणे देखील तेवढेच औत्सुक्याचे ठरणार असल्यामुळे  सर्वच माथेरानकरांचे लक्ष या सुनावणीच्या निकालाकडे लागले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत