बंदूक दाखवताना चुकून मित्रावरच गोळीबार, ठाण्यातील घटना

ठाणे : रायगड माझा ऑनलाईन 

ठाण्यातील किसननगर येथे मंगळवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. याप्रकरणी अक्षय पवार नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे या गावठी रिव्हॉल्व्हरचा परवाना नसून त्याने ती कोणाकडून आणली, या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत. तर, गोळीबारात जखमी झालेल्या विजय यादव (20) याच्यावर वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून यशस्वीरीत्या गोळी काढल्याची माहिती आहे.

मात्र, आपल्याकडून विजय यादव याच्यावर चुकून गोळी चालली, असा दावा अक्षयने पोलिसांकडे केला आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अक्षय, विजय आणि अवधेश यादव असे तिघे मित्र किसननगर येथील इस्टेट एजंट ऋषिकेश माने यांच्या गोदामामध्ये 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वा.च्या सुमारास बसले होते. त्याचवेळी अक्षयने आपल्याकडे एक रिव्हॉल्व्हर असल्याचे विजयला सांगितले. ती खोटी असावी, या शक्यतेने रिव्हॉल्व्हर बघण्याची उत्सुकता विजयनेही दाखवली. ती आपल्या मित्रांना दाखवताना निष्काळजीपणे हाताळल्यामुळे रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली आणि विजयच्या पोटाला गोळी लागली. त्यानंतर तातडीने त्याला वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले, असा दावा त्याने पोलिसांच्या चौकशीत केला आहे. अशीच माहिती विजय आणि अवधेश यांनीही पोलिसांकडे दिल्याचं समजतंय. तरी, अक्षयकडे रिव्हॉल्व्हर आली कुठून याबाबत त्याच्याकडून योग्य माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ते कचऱ्यात मिळाल्याचा दावा त्याने केला आहे.

दरम्यान, अक्षयला 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत