बनावट धनादेशाद्वारे २५ लाखांना गंडा

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त

कोलकाता येथील व्यापाऱ्याला बनावट धनादेशाच्या आधारे २५ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याची सूत्रे रत्नागिरीतून हलल्याने कोलकाता पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेतले.

मूळ जळगाव येथील असलेला कैलास सोनावणे हा मित्राच्या साह्याने बनावट धनादेश तयार करून त्याद्वारे दुसऱ्याच्या खात्यातील पैसे काढत होता. कोलकाता येथील स्टील ॲण्ड मेटल कंपनीच्या खात्यावरील त्यांनी २५ लाख रुपये काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

संशयित कैलास सोनावणे (रा. जळगाव) साथीदारासह रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथे काही महिन्यांपासून भाड्याच्या खोलीत राहत होता. याच कालावधीत त्याने कोलकाता येथील स्टील ॲण्ड मेटल कंपनीचा बनावट धनादेश तयार केला. त्याद्वारे २५ लाख रुपये रत्नागिरीतील एका खासगी बॅंकेच्या माध्यमातून त्याने वटवला. २५ लाखांपैकी ९ लाख दुसऱ्या खात्यात वर्ग केले. तर ९ लाखांची रोकड काढली होती. उर्वरित ७ लाख कैलास सोनावणे याच्या खात्यावर होते.

कोलकाता येथील व्यापारी आदित्य खेमका यांनी कोलकात्ता पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीवरून कोलकाता पोलिसांचे विशेष पथक सोनावणे व त्याच्या साथीदाराच्या शोधात रत्नागिरीत आले होते. कैलासने बॅंक खाते उघडण्यासाठी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे कोलकाता पोलिसांच्या विशेष पथकाने स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन कैलास सोनवणे व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. येथून काही कागदपत्रे जप्त करण्यात त्यांना यश आले.

कैलास सोनावणे याने रत्नागिरीत बनावट कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीच्या माध्यमातून आपण लाखो रुपयांची उलाढाल करत असल्याचे तो घर मालकांसह बॅंक कर्मचाऱ्यांना भासवत होता. आपण मोठे व्यावसायिक आहोत, असा समज त्याने करून दिला होता. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

किती बॅंकाला फसवले?
सोनावणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने रत्नागिरीत राहून कोलकाता येथील व्यापाऱ्याच्या धनादेशाचा तपशील कसा मिळवला हे शोधण्याचे आव्हान कोलकाता पोलिसांसमोर आहे. तर कैलासने रत्नागिरीतील किती बॅंकाला फसवले आहे हे ही पोलिस तपासात पुढे येणार आहे.

बॅंक अधिकाऱ्यांची पोलिसांकडे धाव
बनावट धनादेश पास करणाऱ्या बॅंकेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून धनादेश, चलनी नोटा याची खातरजमा केली जाते. यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार आहे. असे असताना बनावट धनादेश बॅंकेने पास कसा केला, असा सवाल उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकारानंतर बॅंक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सोनावणे याला ताब्यात घेतल्यानंतर अनेक बॅंक अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत