बलात्काराच्या प्रकरणात आरोपींना वीस वर्षे सश्रम कारावास

Crime

नागपूर : रायगड माझा वृत्त

चार वर्षांपूर्वीच्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (मंगळवार) वीस वर्षे सश्रम कारावास सुनावला आहे. अफरोज टोळीच्या पाच सदस्यांना तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मोहम्मद अफरोज जियाउद्दीन पठाण (२१), अनिल राजू इंगळे (२१) आशीर्वादनगर, अश्विन अशोक दोनाडे (२३) आशीर्वादनगर, पुंडलिक डोमाजी भोयर (३४) संजय गांधीनगर आणि रोशन ऊर्फ आशीष मधुकर इंगळे (२२) भावनानगर अशी आरोपींची नावे आहेत. १ डिसेंबर २०१४ ला रात्री ही घटना घडली होती. पीडित २१ वर्षीय तरुणी कापसी उड्डाणपुलाजवळ आपल्या मित्रासह बोलत होती. त्यावेळी आरोपी तेथे पोहोचले व आपण पोलिस असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तरुणीला व तिच्या मित्राला धाक दाखवून पोलिस स्टेशनला चलण्यास सांगितले. आरोपींनी दोघांनाही वेगवेगळ्या दुचाकीवर बसवले. दरम्यान, आरोपी अंधारात घेऊन जात असताना तिच्या मित्राने उडी मारली व पळून गेला. त्यानंतर आरोपींनी तिला एका निर्जनस्थळी नेले. पाचही जणांनी चाकूच्या धाकावर तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. रात्री तिला दुचाकीने बेसा परिसरात सोडून दिले.

रात्री उशिरा घरी परतल्याने वडिलांनी विचारणा केली. त्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी कळमना पोलिस स्टेशनला तक्रार दिली. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांच्यासमक्ष खटला चालवण्यात आला. साक्षीपुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने आरोपींना सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी धरून २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपींतर्फे ॲड. चंद्रशेखर जलतारे, ॲड. चेतन ठाकूर, ॲड. पराग उके, ॲड. वासनिक आणि सरकारतर्फे ॲड. आसावरी परसोडकर यांनी बाजू मांडली.

असा लागला आरोपींचा सुगावा 
पळून गेलेला मुलीचा प्रियकर थेट कळमना ठाण्यात पोहचला. त्याने पीआय सत्यवीर बंडिवार यांना प्रेयसीचे अपहरण झाल्याची माहिती दिली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठले तसेच मुलीच्याही घरी चौकशी केली. आरोपींनी मुलीला तिच्या घराजवळ सोडून पळ काढल्याचे लक्षात आले. अंधारात मुलीने आरोपींचे चेहरेसुद्धा बघितले नव्हते, त्यामुळे आरोपींबाबत सुगावा लागणे कठिण होते. मात्र, बंडिवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित केवळ बोलीभाषा आणि अशा घटनांमधील आरोपींची शक्‍यतेच्या बळावर आरोपींचा सुगावा लावला. आरोपींनी खाक्‍या दाखवताच कबुली दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत