बस आणि टॅंकर यांच्यात भीषण अपघात; एक ठार; 41 जखमी

यवतमाळ : महाराष्ट्र News 24 वृत्त

आज सकाळी साडेसातच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील आजंती (ता. नेर) येथे वाढोणा ते नेर जाणारी एसटी व टॅंकर यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 41 जण जखमी झाले. यात चालक गंभीर जखमी आहे. तसेच शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. दाट धुक्‍यामुळे वळणावर ही गंभीर दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तालुक्‍यातील आजांती रोडवर गावानजीक हा अपघात घडला असून, यवतमाळ येथील लाठीवाला पेट्रोल पंपाच्या टॅंकर क्र. चक 29/ढ 925 हा अकोला येथे पेट्रोल आणण्यासाठी जात होता. नेर आगाराची वाढोना येथे मुक्कामी असलेली बस क्र. चक 40/छ 8477 ही खरडगाव शिरज गाव मार्गे नेर येथे येत असताना समोरा-समोरा धडक लागून बसचा चालकाकडील दर्शनी भाग क्षणात चकणाचूर झाला. यामध्ये कीर्तनकार प्रवासी रामभाऊ पुणाजी जावळे (वय 75, रा. मोरेगाव सादीजन ता. बाळापूर, जि. अकोला) हे जागीच ठार झाले. बस चालक शेख अशपाक शेख अजीज (वय 50, रा. खिडकीपुरा नेर) यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहे. त्यांची स्थिती अत्यंत नाजूक आहे.

नेर ग्रामीण रुग्णालयात जखमींना दाखल केले आहेत. काहींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रुग्णवाहिकांची कमतरता असल्याने शिवसैनिकांनी तातडीने खासगी वाहनातून काही जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सकाळची बस असल्याने बसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. मुलांच्या बसचा अपघात झाल्यामुळे पालकांनी नेर रुग्णालयात गर्दी केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत