बहुप्रतीक्षित ‘मुंबई पुणे मुंबई- ३’चा टीझर प्रदर्शित

मुंबई : रायगड माझा वृत्त 

आठ वर्षांपूर्वी ‘मुंबई पुणे मुंबई’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आणि दोन वर्षांपूर्वी आलेल्या व यशस्वी ठरलेल्या त्याच्या सिक्वेलनंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. अशाप्रकारचा मराठीतील हा पहिलाच प्रयत्न असून चित्रपट वर्ष अखेर प्रदर्शित होत आहे. ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’च्या या बहुप्रतीक्षित ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाचा टीझर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातील स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीझर प्रेक्षकांना देतो.

‘मुंबई पुणे मुंबई’ आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्याने इतिहास रचला. लोकप्रियता, चित्रपटगृह खिडकीवर केलेला व्यवसाय आणि या जोडीच्या घराघरात पोहोचण्याची प्रक्रिया या सर्वच बाबतीत या चित्रपटाने उत्तुंग परिमाणे स्थापित केली. चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपर डुपर हिट ठरला होता. तीन वर्षांपूर्वी जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला तेव्हा या यशाची पुनरावृत्ती झाली. आता हाच इतिहास पुन्हा गिरविला जाणार आहे. निर्माते संजय छाब्रिया आणि सहनिर्माते व ’52 फ्रायडे सिनेमाज’चे अमित भानुशाली यांनी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासह चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. चित्रपट संपूर्ण राज्यात ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, ‘मुंबई पुणे मुंबई’ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची आता सवय लागून राहिली आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडते आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागून राहिलेली असते. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या घोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत. मुंबई पुणे मुंबई’चे चित्रीकरण करत असताना आम्हाला या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असे वाटले नव्हते. पण दुसऱ्या भागाचे चित्रीकरण करत असताना या चित्रपटाच्या पुढच्या भागालाही वाव आहे, हे मात्र स्पष्टपणे जाणवले होते. येणाऱ्या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक काही बोलणे उचित होणार नाही, पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, हा तिसरा भागही तेवढाच यशस्वी ठरणार आहे.’

‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्याची अनेक भारतीय भाषांमध्ये पुनर्निर्मिती झाली. या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरासिकांकडून झाली. प्रेक्षकांनी केलेल्या विनंतीला मान देऊन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती केली गेली होती. स्वप्नील आणि मुक्ता ही जोडी रसिकांना खूपच भावली होती. दोन्ही चित्रपटांना सिनेरसिकांकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता. ही बाब बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने केलेल्या व्यवसायातूनही स्पष्ट झाली होती. चित्रपटाची ओळख त्याचे गुणी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यामुळेही आहे. त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. चित्रपटाच्या या तिसऱ्या भागातही स्वप्नील व मुक्ता ही हिट जोडी प्रमुख भूमिकेत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत