बांगलादेशी नागरीकाकडे आधार, पॅनकार्ड

ठाणे : रायगड माझा वृत्त

भारतात बेकायदा घुसखोरी करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाकडे चक्क आधारकार्ड आणि पॅनकार्ड सापडल्याची धक्कादायक बाब भिवंडी पोलिसांच्या कारवाईतून समोर आली आहे. विशेष म्हणजे या बांगलादेशी नागरिकाने भिवंडीत प्लम्बिंगचा व्यवसाय थाटला होता. मागील अनेक वर्षापासून तो भिवंडीत वास्तव्य करत असून आरोपीविरुद्ध भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलाउद्दीन अमीनुल हक शेख (३४) असे या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. १२ वर्षांपूर्वी तो दलालांच्या मदतीने छुप्या मार्गाने भारतात आला होता. हावडा रेल्वे स्टेशन येथून त्याने रेल्वे पकडली आणि कल्याण गाठले. नंतर भिवंडीत आल्यानंतर मामाच्या घरी राहू लागला. मामाने प्लंबरचे काम शिकवले होते. मात्र पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांवर कारवाई सुरू केल्यानंतर भीतीने ६ ते ७ वर्षे भिवंडीत वास्तव्य करणारा शेख पुन्हा बांगलादेशात पळाला. मात्र पुन्हा दीड वर्षांपूर्वी दलालाच्या मदतीने भिवंडीत आला. येथील शेलार गावातील ओळखीच्या व्यक्तीकडे त्याने आसरा घेतला होता. नंतर कामतघर येथे भाड्याने घर घेतले होते.

बुधवारी सायंकाळी पोलिस पद्मानगर भागात गस्त घालत असताना पेटा अपार्टमेंटमधील गाळा नंबर १ मध्ये एका बांगलादेशी विनापरवाना राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ पोलिसांनी येथून सलाउद्दीनला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या सलाउद्दीनकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती पुढे आली. यावेळी पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता सलाउद्दीनच्या नावाने आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल आदी मुद्देमाल मिळाला. ही सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत