रायगड माझा
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात भारतीय सीमासुरखा दलाचे चार पोलीस शहीद झाले आहेत. तर, अनेक पोलीस जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी श्रीनगर इथं हलविण्यात आलं आहे.
सोपोर येथील छोटा आणि बडा बाजारच्या मधोमध असलेल्या एका गल्लीत दहशतवाद्यांनी तीव्र क्षमतेची स्फोटके पेरून ठेवली होती. शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास त्यांचा स्फोट झाला. त्यात चार पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. हुरियत कॉन्फरन्सने शनिवारी सोपोर बंदचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर या भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. दरम्यान, पोलीस कर्मचारी गस्त घालत असतानाच हा भीषण स्फोट झाला. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला असून लष्कर, सीआरपीएफ व एसओजी जवानांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. याबाबत, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पोलिसांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.