बारावीच्या हॉलतिकिटावर चुकाच चुका, दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट देताना शुल्क आकारले जाऊ नये या शिक्षण मंडळाच्या सूचना अनेक महाविद्यालयांनी पायदळी तुडविल्या आहेत. यंदा प्रथम ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट देण्यात आले. मात्र या हॉलतिकिटांवर विद्यार्थ्याचे नाव, विषय, परीक्षा माध्यम याविषयी असंख्य चुका झाल्या आहेत. या  दुरुस्तीसाठी अभ्यास सोडून महाविद्यालयात खेटे मारणाऱया विद्यार्थ्यांकडून काही महाविद्यालये एका चुकीच्या दुरुस्तीसाठी 50 ते 200 रुपये उकळत असल्याचे समोर आले आहे.

बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अभ्यास अंतिम टप्प्यात असतानाच विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ हॉलतिकिटावरील चुका दुरुस्त करण्याच्या कामात वाया जात आहे. काही विद्यार्थ्यांच्या नावात चुका असून परीक्षेचे माध्यम, विषयातही चुका झाल्या आहेत. काही विद्यार्थ्यांची सही आणि फोटोही हॉलतिकिटावर नीट दिसत नाही. या चुकांची दुरुस्ती विद्यार्थ्यांनी महाविद्यालय स्तरावरून करायची असून काही महाविद्यालये चुका दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांकडून 50 ते 200 रुपये शुल्क आकारत आहेत.

विद्यार्थी भारती या संघटनेने याविषयीची तक्रार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडे केली आहे. शिक्षण मंडळाच्या परवानगीशिवाय हॉलतिकिटावरील चुका दुरुस्तीसाठी पैसे आकारणाऱया महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी भारतीच्या कार्याध्यक्षा साक्षी भोईर, जितेश पाटील, सलोनी तोडकरी मंजिरी धुरी यांनी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडे केली आहे.

दहावी, बारावीच्या हॉलतिकिटावरील चुका दुरुस्तीसाठी शिक्षण मंडळ कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. काही महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून चुका दुरुस्तीसाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत आम्ही सर्व महाविद्यालयांना लेखी आदेश दिले असून चुका दुरुस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊ नये, असे सर्व महाविद्यालयांना कळविले आहे. – शरद खंडागळे, सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळ.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत