बाळासाहेबांचं स्मारक भूमिगत स्वरुपात होणार

मुंबई : रायगड माझा वृत्त

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरच्या महापौर बंगल्यातच होणार आहे. पण बंगल्याच्या हेरिटेज स्वरुपात कोणताही बदल केला जाणार नाही. हे स्मारक भूमिगत स्वरुपात असेल. ९ हजार चौरस फुटांच्या जागेत हे स्मारक होणार आहे. स्मारकासाठी बंगल्याच्या आजुबाजुच्या झाडांची छाटणीदेखील होणार नाही.

महापौर बंगला हा ऐतिहासिक बंगला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या स्मारकात गॅलरी, ग्रंथालय, सेमिनार हॉल, व्याख्यान कक्ष आणि अनेक उपयोगी गोष्टी बनवल्या जाव्यात अशी उद्धव ठाकरे यांची योजना आहे. हा हेरिटेज बंगला २,३०० चौरस फूट जागेवर आहे. स्मारक बनवण्यासाठी हा बंगला लहान पडत होता. पण भूमिगत तयार झाल्यास तो ९ हजार चौ. फुटांवर पसरेल.

हा बंगला १९२८ साली बांधण्यात आला होता. मुंबई वारसा संवर्धन समितीने अलीकडेच बंगल्याचं निरीक्षण केलं होता. समिती स्मारकाच्या नव्या प्लानवर समाधानी आहे. कारण नव्या प्लानमध्ये मूळ बंगल्याचं बांधकाम अबाधित राहणार आहे. पालिकेने हा बंगला १९६२ मध्ये विकत घेतला होता.

असं असेल स्मारक

योजनेनुसार, स्मारकाच्या चहुबाजुंना पाणी असेल. बंगल्यासमोर एकमेव भूमिगत बांधकाम असेल. प्रवेशद्वाराची लांबी १.५ मीटर ने कमी करून १.२ मीटर करण्यात आली आहे. पण हेरिटेज समितीला प्रवेशद्वाराची उंचीदेखील कमी करून हवी आहे. स्मारकाचं नवं डिझाइन हेरिटेज आर्किटेक्ट आभा लांबा यांनी तयार केलं आहे. स्मारकासाठी बंगल्यातील नोकर आणि चालकांच्या खोल्या तोडण्यात येतील.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.