बाळ रडल्यानं भारतीयांना विमानातून उतरवलं

नवी दिल्ली: रायगड माझा वृत्त 
तीन वर्षांचं बाळ रडलं म्हणून युरोपातील प्रतिष्ठित एअरलाइन्स कंपनीनं एका भारतीय कुटुंबाला विमानातून उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळ रडू लागल्यानं त्याची आई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावर विमानातील एका कर्मचाऱ्यानं आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि त्यांना विमानातून उतरवलं, असा आरोप या कुटुंबीयानं केला.
‘तीन वर्षांचं मूल रडू लागल्यानं आई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी विमानातील कर्मचाऱ्यानं त्याला भीती दाखवली. त्यामुळं तो आणखीनच रडू लागला. आमच्यासह विमानातील इतर भारतीय कुटुंबांनीही मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही विमानातून उतरवलं,’ असा आरोप या कुटुंबानं केला.

ब्रिटिश एअरवेजच्या लंडन-बर्लिन (बीए ८४९५)या विमानाच्या उड्डाणावेळी हा कथित प्रकार घडला. या बाळाचे वडील रस्ते वाहतूक मंत्रालयात सहसचिव या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी याप्रकरणी नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे तक्रार केली आहे. ‘सुरक्षेसंबंधी उद्घोषणेनंतर आम्ही सीटबेल्ट बांधत होतो. माझ्या पत्नीनं मुलाला सीट बेल्ट बांधलं त्यावेळी ते रडू लागलं. माझी पत्नी त्याला शांत करत होती. त्यावेळी तेथे विमानातील कर्मचारी आले आणि पत्नी आणि मुलावर जोरजोरात ओरडू लागले. त्यामुळं मूल आणखी घाबरलं,’ असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. विमानाच्या उड्डाणावेळी मुलाला खिडकीतून बाहेर फेकून देण्याची धमकी कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच आमच्या वर्णावरून आक्षेपार्ह टिप्पणी केली. आमच्या आसनाच्या मागे बसलेल्या एका भारतीय कुटुंबानंही मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला; तर त्यांनाही विमानातून उतरवण्यात आलं, असा आरोपही त्यांनी तक्रारीत केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.