बावनकुळे यांना लोकायुक्ताची “क्‍लीन चिट’

नागपूर  : रायगड माझा वृत्त

महानिर्मितीच्या कोराडी येथील औष्णिक केंद्रात झालेल्या भरतीप्रकरणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकायुक्तांकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधातील तक्रार फेटाळली आहे. ही भरती नियमानुसारच असून, उमेदवारांची प्रमाणपत्रे वैध आहेत. यात परत चौकशीची आवश्‍यकता नाही, असा निर्वाळा लोकायुक्त न्यायमूर्ती एम. एल. टहलियानी यांनी दिला.
महादुला नगरपंचायतचे श्रीधर साळवे व सुनील साळवे यांनी यासंदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. कोराडी वीज केंद्रातील भरतीमध्ये बावनकुळे यांनी कुटुंबातील लोकांना नोकरीवर लावल्याचे आरोप केले होते. या तक्रारीवरून सुनावणी करून सर्व बाजू तपासल्यानंतर लोकायुक्त न्या. टहलियानी यांनी तक्रार अर्ज फेटाळला.
सुनावणीत या तक्रारीची काहीही गरज नव्हती. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांनी सादर केलेला अहवाल वाचला आहे. त्यात लावलेले आरोप त्यांच्या अहवालानुसार तथ्यहीन आहेत. हा प्रकार 1991 ते 2006 दरम्यानचा आहे. अशा प्रकरणात घटनेच्या तीन वर्षांपर्यंत तक्रार केल्यास विभागीय आयुक्त त्याची दखल घेतात. या तक्रारीनुसार अशी दोनच प्रकरणे आढळली. यातील दोन्ही प्रमाणपत्रे ही स्थानांतर प्रमाणपत्रे होती. प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या प्रमाणपत्राचे स्थानांतर हे मूळ व्यक्तीच्या विनंती अजार्नंतरच केले होते. तसेच लोकायुक्तांनी या प्रकरणात सर्व प्रमाणपत्रांची तपासणी केल्याचे आदेशात म्हटले आहे.
अहवाल समाधानकारक
उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया पार पाडली. त्यातही चुकीचे असे काहीच आढळले नाही. रोजगार देणाऱ्या एजन्सीलासुद्धा दोषी धरता येणार नाही. कारण, त्यांनी महसूल विभागाने जारी केलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारावर रोजगार दिला. त्यामुळे चौकशीची गरज नाही. बावनकुळे यांच्या संपत्तीची वाटणी झाली आहे. प्रत्येकाला वेगवेगळा प्रकल्पग्रस्त म्हणून मोबदलाही मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीवर प्रश्‍न उपस्थित करता येत नाही. अहवाल समाधानकारक आहे, असे लोकायुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत