बिनीता जैन यांनी केबीसीमध्ये जिंकले एक कोटी पण मिळाले किती?

मुंबई : रायगड माझा वृत्त 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या गेम शो ‘कौन बनेगा करोडपती?-10’ला या मोसमाला पहिला करोडपती स्पर्धक मिळाला. आसामच्या बिनीता जैन यांनी एक एक टप्पा पार करत एक कोटी रुपये जिंकले. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर बिनीता यांना सात कोटींचा प्रश्नही विचारण्यात आला होता. मात्र शेवटच्या प्रश्नाचं उत्तर बिनिता यांना माहित नसल्याने त्यांनी खेळ तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आणि एक कोटी रुपयांमध्ये समाधान मानलं.

खात्यात किती रुपये जमा झाले?

पण कोट्यधीश झालेल्या बिनीता जैन यांच्या बँक खात्यात नेमके किती रुपये जमा झाले याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल. अनेकांनी गुगल, यूट्यूबवर याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्नही केला असेल. मात्र याचं उत्तर खुद्द बिनीता जैन यांनीच दिलं आहे.  जिंकलेल्या एक कोटी रुपयांवर 33 टक्के टॅक्स लागेल. त्यामुळे जवळपास 67 लाख रुपये बँकेत जमा होतील, असं बिनीता जैन यांनी सांगितलं.

परंतु संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांनी ही रक्कम बँक अकाऊंटमध्ये जमा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच एक कोटी रुपयांसोबत मिळालेली महेंद्रा मराझ्झो या कारवरही टॅक्स लागणार असल्याचं बिनीता जैन यांनी सांगितलं. ही कार म्हणजे सरप्राईजच होतं, असंही त्या म्हणाल्या.

एक कोटी रुपयांचं काय करणार?

एक कोटी रुपयांचं काय करणार, असा प्रश्न विचारलं असता, बिनीता जैन म्हणाल्या की, “हे एक कोटी माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. इतरांप्रमाणे आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींसाठी मला हे पैसे वापरायचे आहेत. सध्या माझ्यासाठी मुलाचं करिअर महत्त्वाचं आहे. तो डेन्टिस्ट आहे, आता तो एमडी पूर्ण करत आहे. सात-आठ महिन्यांमध्ये तो ऑर्थोडोन्टिक्स बनेल. मला त्याच्यासाठी एक क्लिनिक बनवायचं आहे.

“तसंच शिक्षणाच्या क्षेत्रात मला माझ्या परीने शक्य तेवढं सामाजिक कार्य करायचं आहे. ज्या मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे महागडे कोचिंग क्लास परवडत नाही, त्यांच्यासाठी मला काम करताचं आहे.

काय होता सात कोटींचा प्रश्न?

1867 मध्ये पहिल्यांदा स्टॉक टिकरचा शोध कुणी लावला होता? असा प्रश्न बिनीता यांना सात कोटींसाठी विचारण्यात आला होता. मात्र बिनीता यांना स्टॉक टिकर म्हणजे काय हे देखील माहित नव्हत. त्यामुळे त्यांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र खेळ सोडला तरी स्पर्धकाला उत्तर देण्याची संधी केबीसीमध्ये मिळते. ती संधी बिनिता यांनाही मिळाली आणि त्यांनी या प्रश्नाचंही बरोबर उत्तर दिलं. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासह सर्वांनाच दु:ख झालं.

दहशतवाद्यांकडून पतीचं अपहरणबिनीता यांनी शोदरम्यान त्यांच्या आयुष्यातील काही दु:खद अनुभवही सांगितले. बिनीता यांचे पती 2003मध्ये बिझनेस ट्रिपसाठी गेले होते, मात्र तिथून ते परतलेच नाहीत. दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती नंतर उघड झाली. बिनीता यांच्या कुटुंबियांनी त्यांना शोधण्यासाठी आणि परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी बिनीता यांच्यावर आली. त्यावेळी बिनीता यांनी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. सात विद्यार्थ्यांपासून त्यांनी शिकवणी घेण्यास सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे 125 विद्यार्थी आहेत. बिनीता यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास ऐकल्यानंतर अमिताभ बच्चनही भावूक झाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत