बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

रायगड माझा

ऊस तोडणीचे काम करत असताना एका महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. यावेळी तिच्या मानेवर झडप घालुन त्यानंतर बिबटय़ाने या महिलेला २० मीटर दूर जंगलात फरफटत नेले. या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
जुन्नर येथील यंदे हिवरे येथे ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव सविता भिमराव वायसे असे आहे. पहाटे सहा वाजता शेतामध्ये १५ महिला ऊस तोडणीचे काम करत होत्या. ऊस तोडणीचे काम सुरू असताना एका झाडाखाली थोड्यावेळा करीता विश्रांतीसाठी गेलेल्या सविता यांच्यावर अचानक एका बिबट्याने झडप घालून त्यांना फरफटत नेले. एका ट्रॅक्टरचालकाने हा प्रकार पाहिला आणि त्यांनी बिबट्याचा पाठलाग करत सदर महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला. बिबट्याच्या तावडीतून या महिलेची सोडवणूक करण्यात आल्यानंतर तिला नारायणगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वायसे यांच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या महिलेची प्रकृती गंभीर आहे. तिला श्वास घेण्यास त्रास होत असून सध्या ती कोमामध्ये आहे, असे तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर अजय देशमुख यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत