बिल्डर लॉबीवर रायगड जिल्हा परिषदेची मेहेरनजर, बिल्डर लॉबीची जबाबदारी घेतली स्वतःच्या खांद्यावर

 

(नेरळ दिपक पाटील )

नेरळ विकास प्राधिकरण हद्दीत असलेल्या ममदापुर येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहेत. त्या ठिकाणी असलेल्या बिनशेती भूखंडावर गृह संकुल उभे राहत असतांना त्या बिल्डर लॉबीची जबाबदारी देखील महत्वाची असताना ती जबाबदारी झटकली जात असल्याचे दिसून येत आहे. बिल्डर लॉबीने करावयाची कामे जिल्हा परिषद आणि नेरळ विकास प्राधिकरण करणार असल्याने ही खुश मस्करी कोणासाठी ? आणि कशासाठी ? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

काय आहे प्रकरण

ममदापूर मध्ये उद्यान विकसित करणार असल्याचे तथाकथित बिल्डर असोसिएशनकडून सांगण्यात आले होते. मात्र आता ममदापुर मधील दीड एकरातील उद्यान या भागात जमीन विकसित करणारे बिल्डर करणार नाहीत …..! तर ही जमीन विकसित करण्याचे काम बिल्डर लॉबीचा खर्च वाचविण्यासाठी रायगड जिल्हा परिषद स्वतः करणार आहे. नेरळ विकास प्राधिकरण मध्ये ममदापुर गावातील उद्यान बांधण्यासाठी 50 लाख खर्च जिल्हा परिषद करणार आहे. हे ऐकून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत, कारण रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी त्या उद्यानाच्या निर्मिती साठी 30 लाखाची तरतूद केलेल्या निधीचे पत्र तात्काळ दिले असून आणखी 20 लाखाची तरतूद केली जाणार असल्याची माहिती दिली.

बिल्डर लॉबीने करायचा खर्च जिल्हा परिषद आपल्या अंगावर ओढून का घेते? याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. तर बिल्डर लॉबीचे लाखो रुपये वाचविण्याचा रायगड जिल्हा परिषदेचा हा प्रयत्न कशासाठी ? असा सवाल ममदापुर ग्रामस्थ विचारत आहेत. कारण हे उद्यान ज्या ठिकाणी उभारले जाणार आहे,त्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ममदापुर गावात शेवटच्या घरापर्यंत पाण्याचा थेंब पोहचत नाही. गावात कुठेही दोन गुंठे जमिनीवर गार्डन नाही. असे असताना बिल्डर लॉबीचा खांद्यावरील भार रायगड जिल्हा परिषद आपल्या खांद्यावर का घेत आहे?याचे उत्तर काही मिळू शकले नाही. रायगड जिल्हा परिषदेचे ममदापुर भागातील बिल्डर लॉबी बरोबर कोणते आर्थिक संबंध आहेत ? याची चर्चा सुरू झाली आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत