बुलडाण्यात दोन गटांमध्ये दगडफेक; पाच जखमी, एकाची प्रकृती गंभीर

खामगाव : रायगड माझा

बुलडाण्यातील खामगावमधील हनुमान मंदिराजवळ कचरा टाकण्यावरून वाद उद्भवल्याने दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. यात पाचजण जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. पोलिसांनी परिस्थिती लगेचच नियंत्रणात आणली. मात्र या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

खामगाव शहरापासून जवळच असलेल्या सजनपुरी भागातील रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराशेजारी कचरा टाकण्यावरून शनिवारी संध्याकाळी दोन गटात वाद उद्भवला. या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. यात पाच जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींपैकी तिघांवर सामान्य रुग्णालयात तर एकावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. खासगी रूग्णालयात भरती असलेल्या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला असतानाच, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वेळीच परिस्थिती नियत्रंणात आणली.

तिघांवर सामान्य रूग्णालयात उपचार
दोन्ही गटाकडून करण्यात आलेल्या तुफान दगडफेकीत जखमी झालेल्या तिघांवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोल भास्कर गीते (२२), शे. अजीज शे. लुकमान (२२), किशोर मारोती नाईक (२५) अशी जखमींची नावं आहेत. तर डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी असलेल्या अनिल दशरथ बेनीवाल (३२) यांच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नटवरलाल गोपीलाल पल्लोड (६०) रा. पैठण जखमी अवस्थेत घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे.

रिक्षा उलटवली; चारचाकीच्या फोडल्या काचा

या घटनेत एक रिक्षा उलटविण्यात आली. तर एका चारचाकी गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. काचा फुटल्याने पैठण येथील एक व्यक्ती जखमी झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. एका विशिष्ट समाजाच्या वस्तीवर दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या वस्तीतील नागरिकांचे प्रंचड नुकसान झाले.

पोलिसांच्या मदतीला धावला वरूणराजा
दोन गटात दंगल उद्भवल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी खामगावात पाऊस सुरू झाला. दगडफेकीत नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पावसाची चांगलीच मदत झाली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. सोबतच शिवाजी नगर पोलिस स्टेशनचा ताफाही धडकला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत