बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी होणार वनक्षेत्राचा नाश

या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील सुमारे ७७.४५ हेक्टर वनक्षेत्राचा नाश होणार

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील सुमारे ७७.४५ हेक्टर वनक्षेत्राचा नाश होणार असून त्यामध्ये १८.९८ हेक्टर खारफुटी क्षेत्राचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक जमीन ठाणे जिल्ह्यातील असून अत्यंत संवेदनशील अशा परिसरातूनही बुलेटचा मार्ग जाणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्य प्राणी अभयारण्य आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यालगतच्या भागातून हा मार्ग जाणार आहे. किनारा नियमन क्षेत्र अधिसूनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या ठाणे खाडी आणि उल्हासनदीच्या तीन टप्प्यांमधून हा मार्ग जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणाम मसुद्यातून ही माहिती समोर आली आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठा नाश होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष आग्रह असलेल्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची मोठी जमीन नष्ट होत आहे. शेतजमिनीचे मालक असलेले शेतकरी याविरोधात आवाज उचलत असताना शहरांची फुफ्फुसे असलेली जंगलांचीही मोठी हानी या प्रकल्पामुळे होणार आहे. वनक्षेत्रातून विकास प्रकल्प राबवण्यासाठी पर्यावरण विभागकडून अनेक मर्यादा घातल्या जात असल्या तरी बुलेट प्रकल्पासाठी ७७.४५ हेक्टर वनक्षेत्र देण्यासाठी अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही या जमिनींवरील वने आणि खारफुटी अन्यत्र स्थलांतरितही होणार नसल्यामुळे त्यांचा केवळ विद्ध्वंस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पाच्या बदल्यात पर्यायी वनीकरण, वृक्षलागवड आणि खारफुटीची जंगले वाढवण्याचा उपाय प्रशासनाकडून सुचवण्यात आला असला तरी आत्तापर्यंतच्या प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीची हानी कधीच भरून निघण्याइतके वृक्षारोपण झाले नसल्यामुळे त्याचा फटका पूर्णपणे पर्यावरणाला बसणार आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या वनक्षेत्राच्या तुलनेत महाराष्ट्रातील वनक्षेत्र अधिक असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत