बेकायदेशीर विद्युतपोल उभारणीचे काम बंद करण्याची पोशीर ग्रामस्थांनी मागणी

बेकायदेशीर पोल टाकण्याच्या कामाला स्थगिती मिळण्यासाठी पोशीर ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाला निवेदन

नेरळ पोलीस आणि ग्रामस्थांना दिशाभूल करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न 

नेरळ :  कांता हाबळे

नेरळ-कळंब मार्गावरील विद्युतपोल उभारणीचे बेकायदेशीर कामास स्थगिती देण्याऐवजी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी धृतराष्ट्राची भूमिका निभावल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. यामागे खूप मोठे अर्थकारण झाल्याचा संशय उघडपणे नागरिकांनी व्यक्त केला जात आहे. याबाबत नेरळ पोलीस आणि ग्रामस्थांची दिशाभूल प्रयन्त सुरू आहे. बांधकाम विभागाने नोटीस देऊनही हे काम सुरूच आहे. याबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी आणि महावितरण चे अधिकारी यांनी अद्याप या कामाची पाहणी सुद्धा केली नसल्याने आचार्य व्यक्त केले जात आहे. या कामाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी पोशीर ग्रामस्थांनी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.


संबंधित कामाबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता आणल्याचे सांगून काम नियमानुसार आहे असे सांगून ग्रामस्थ व पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नदेखील संबंधित ठेकेदार कंपनीच्या वतीने करण्यात आला. मात्र पोशीर ग्रामस्थांनी बुधवारी नेरळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांची भेट घेऊन सदर प्रकरणी आपली कशी दिशाभूल केली जात आहे ते निदर्शनास आणून दिले .सदर काम हे बेकायदेशीर सुरू असून पोलीस स्थगिती आदेशाची वाट पाहत आहेत .याप्रकरणी सदर कामास त्वरित स्थगिती मिळावी यासाठी कर्जत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता सर्वगौड यांची भेट घेतली सदर कामास त्वरित स्थगिती आदेश द्यावा व सर्व पोल पोलीस बंदोबस्तात काढून टाकावेत अशी लेखी पत्र देऊन विनंती केली मात्र सर्वगौड यांनी आपली जबाबदारी झटकत सदरप्रकरणी वरिष्ठ निर्णय घेतील असे उत्तर ग्रामस्थांना दिले आहे.

याप्रकरणी संबंधित विभागाकडे तसेच वरिष्ठ कार्यालय पनवेल यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. तसेच मा.जिल्हाधिकारी, रायगड तसेच मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत तहसीदार, नेरळ पोलीस स्टेशन यांना लेखी कळवण्यात आले आहे. सदर काम हे अद्याप सुरू असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी तिकडे फिरकतदेखील नाहीत याबद्दल ग्रामस्थ व प्रवासी यांनी केवळ नाराजीच नव्हे तर संशय व्यक्त केला आहे.

सदर काम हे नियमबाह्य असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने 15ऑक्टोबर रोजी ठेकेदार कंपनीला नोटीस बजावली आहे आणि 25ऑक्टोबर रोजी सदर कामाची परवानगी दंडात्मक कारवाईसह रद्द करण्याबाबत वरिष्ठ पनवेल कार्यालयास कळवले आहे .आणि लगेच 26 ऑक्टोबरला यांना वरिष्ठ कार्यालयातून मान्यता आदेश मिळतो इतकी तत्परता सर्वसामान्य लोकांबाबत कधीच नसते. इतका संवेदन शील विषय असूनही लगेच मान्यता दिली जाते हा प्रकार संशयास्पद आहे.यावरून सार्वजनिक विभागाच्या दोन्ही कार्यालयामध्ये समन्वय नसल्याचा आभास निर्माण करून नियमबाह्य कामास अनुमोदन दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

नेरळ – कळंब रस्त्याच्या साईड पट्टीवर जे विद्युत पोल उभारणीचे काम सुरू आहे,ते चुकीच्या पद्धतीने असून यात कोणाताही अपघात घडल्यास संबंधित विभाग जबाबदार असेल, या संदर्भात अधिकारी वर्गाशी बोलणं झालं आहे. साईडपट्टीवर कोणत्याही प्रकारे खोदाई करून पोल अथवा केबल टाकू नये. कायद्यात अशा कामांना परवानगी नाही, अशा प्रकारे ठेकेदाची मनमानी सहन केली जाणार नाही.
– सुरेश लाड, आमदार, कर्जत,

याप्रकरणी संबंधित विभागाकडे तसेच वरिष्ठ कार्यालय पनवेल यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. तसेच मा.जिल्हाधिकारी,रायगड तसेच मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस स्टेशन, कर्जत तहसीदार यांना लेखी कळवण्यात आले आहे .या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची व कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे, तरीही काम सुरू आहे , हे काम त्वरित बंद करण्यात यावे, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी आमच्यावर आंदोलनाची वेळ आणू नये.
-प्रवीण शिंगटे, ग्रामस्थ, पोशीर

या संदर्भात कर्जत महावितरनाचे उप अभियंता आनंद घुळे यांच्याशी या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयन्त केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जतचे उप अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची पोशीर ग्रामस्थांनी भेट घेतली. व पोशीर रस्त्यावर पोल उभारणीचे काम हे रस्त्याच्या साईडपट्टीवर सुरू असून संबंधित पोल रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर अंतर न सोडता उभे केले आहेत. सदर काम धोकादायक असल्याने या कामाला स्थगिती देण्यात यावी व सदर पोल पोलीस बंदोबस्तात काढून टाकण्यात यावे असे पत्र दिले. त्यावेळी त्यांनी हे काम आमच्या वरिष्ठ कार्यालयाचे असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकत सदरप्रकरणी वरिष्ठ निर्णय घेतील असे उत्तर ग्रामस्थांना दिले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत