बेवफा सनम!!!… पसरणी घाटात त्या दिवशी नेमकं काय घडलं?

रायगड माझा वृत्त | सातारा

साताऱ्याच्या पसरणी घाटात आनंद कांबळे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे आनंदचीच पत्नी आणि तिच्या प्रियकराचा हात असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्या दिवशी पसरणी घाटात नेमकं काय घडलं? आणि हा प्रकार नेमका काय आहे?

 

     व्हिडिओ पहा….

औंधच्या डीपी रोड भागात राहाणारा आनंद कांबळे… आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आणि संघर्ष युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष असलेला आनंद परिसरात चांगलाच प्रसिद्ध होता. 26 मे रोजी त्याचा विवाह झाला होता. हा विवाह आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल याची तसेच यापेक्षा भयंकर प्रकार म्हणजे आपली होणारी पत्नीच आपल्यासाठी काळ ठरेल याची त्याला पुसटशी कल्पना नसेल. मात्र हे घडलं… अर्धांगिणी बनून आलेल्या पत्नीने त्याचा घात केला आणि त्याला यमसदनी पाठवलं.

दीक्षा ओव्हाळ… आनंदच्या पत्नीचं नाव… लग्नापूर्वी तिचे निखिल मळेकर नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची फॅन असलेली दीक्षा राणादा आणि पाठकबाईच्या जागेवर स्वतःला आणि निखिलला पाहात असे. तिच्या फेसबुक टाईमलाईनवर तुम्हाला या मालिकेशिवाय इतर एकही फोटो दिसणार नाही. सोबतीला आहे शायरी तसेच निखिलसाठी घेतलेल्या आणाभाका… यातील अनेक पोस्टमध्ये तिने निखिललाही टॅग केलं होतं. या फेसबुक पोस्ट वाचल्यानंतर कळतं, की दीक्षा निखिलसाठी किती वेडी झाली होती.

दीक्षानं लग्नाला होकार देताच तिच्या घरच्यांनी नात्यातलंच एक स्थळ शोधलं. ते स्थळ होतं आनंद कांबळेचं… आपल्याला सुंदर आणि सुविद्य पत्नी मिळणार म्हणून आनंद खूश होता. तर इकडे निखिलसोबत आपलं लग्न होऊ शकत नाही या दुःखात दीक्षा होती. आनंदसोबत लग्न ठरलं तरी दीक्षा आपला प्रियकर निखिलसोबत संपर्कात होती. लग्नाला होकार देताना किंवा त्यानंतर तिच्यात आणि निखिलमध्ये काय शिजलं? हे नक्की माहीत नाही, मात्र हे लग्न एका वेगळ्या वळणार जाणार होतं.

26 मे रोजी आनंद आणि दीक्षाचा लग्नसोहळा पार पडला. नववधूनं घरात पाऊल टाकल्यानं कांबळे कुटुंब आनंदात होतं. घरात उत्साहाचं वातावरण होतं. लग्न होऊन दोन-तीन दिवस उलटले आणि महाबळेश्वरला हनिमूनला जाण्याचा प्लॅन आखण्यात आला. काळेवाडीमध्ये राहणारा आनंदचा मित्र राजेश बोबडे आणि त्याची पत्नी कल्याणी त्यांच्यासोबत महाबळेश्वरला येणार होती. आनंदनं हा प्लॅन दीक्षाला सांगितला. तीही तयार झाली. लग्नानंतरही प्रियकर निखिलच्या संपर्कात असलेल्या दीक्षानं त्याला हा प्लॅन सांगितला आणि आनंदला संपवण्याचा कट शिजला. निखिलने पुण्यातील एका गुंडाला आनंदला संपवण्याची सुपारीच देऊन टाकली.

हनिमूनसाठी चारचाकी गाडीतून चौघेही पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेनं निघाले. मोबाईलद्वारे निखिलच्या संपर्कात असलेली दीक्षा त्याला माहिती पुरवत होती. दोन दुचाकी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होत्या. पसरणी घाटात आपल्या मळमळ होत असल्याचं दीक्षानं आनंदला सांगितलं तसं त्यांनी गाडी थांबवली. दीक्षा उलटी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला गेली तर आनंद तिच्याजवळ उभा राहिला. गाडीतलं दुसरं जोडपं जवळच्या कठड्यावर फोटो काढण्यासाठी गेलं. मागून 2 दुचाकींवर आलेल्या चौघांनी गाडी थांबवून दीक्षाच्या अंगावरील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला, यावेळी प्रतिकार करणाऱ्या आनंदवर कोयत्याने वार करण्यात आले. आनंद रक्ताच्या थारोळ्यात पडला. आरोपींनी पळ काढला. आनंद बोबडे यांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. आनंदला साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र पोलिसांनी त्याला मृत घोषित केलं.

प्रत्यक्षदर्शी घटना लुटीतून घडल्याचं वाटत होतं. सातारा पोलिसांनी याप्रकरणी आनंदची पत्नी दीक्षाची चौकशी करण्यास सुरुवात केली. पतीच्या हत्येनंतरही दीक्षाच्या चेहऱ्यावर किंवा वर्तनात जास्त दुःख झाल्याचं कुठंही दिसत नव्हतं. पोलिसांना याप्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचं संशय आला. दीक्षाने सांगितलेल्या माहितीतही विसंगती असल्याचं दिसत होतं. संशय वाढत गेला तशी पोलिसांनी दीक्षाचीच जास्त चौकशी केली. त्यानंतर जे सत्य बाहेर आलं, ते ऐकून पोलीसही अवाक् झाले. प्रियकराच्या मदतीने आपणच पतीला संपवल्याचं दीक्षानं कबूल केलं.

 

दीक्षाच्या कबुलीनंतर पोलीस तपासाची चक्रं वेगानं हालण्यास सुरुवात झाली. दीक्षाचा प्रियकर निखिल मळेकरला अटक करण्यासाठी पोलीस पुण्यात दाखल झाले. पुण्याजवळच्या निगडीतून निखिलला अटक करण्यात आली. आता दीक्षा आणि निखिल दोघेही अटकेत आहे. ज्यांना हत्येची सुपारी देण्यात आली होती त्या मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

जे प्रेम मिळवण्यासाठी दीक्षा आणि निखिलनं हे पाऊल उचललं ते प्रेम तर दोघांना मिळालंच नाही, उलट दोघेही आज तुरुंगात आहेत. निष्पाप आनंदचा मात्र यात जीव गेला. त्याच्या कुटुंबियांवर मित्र मंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. असं करुन दीक्षा आणि निखिलला काय मिळालं? असा सवाल आता विचारला जातोय, मात्र याचं उत्तर कुणाजवळचं नाहीये.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत