बोपगाव विकणे आहे…तेही मोफत

अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; संतप्त ग्रामस्थांचा निर्णय

सासवड : रायगड माझा 

पुरंदर तालुक्‍यातील बोपगाव येथील त्रस्त ग्रामस्थांनी संपूर्ण गावच विक्रीला काढल्याची प्रसिध्दीपत्रके गावभर चिकटवून तालुक्‍यातही वाटली आहेत. यामुळे परिसरात गाव विक्रीला काढल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोपगाव ग्रामपंचायतीच्या गावठाणाची 19 एकर गायरान जमीन आहे. ग्रामपंचायतीने गायरानात 9 ते 10 बेघर कुटुंबांना घरे बांधण्यासाठी पूर्वीच जागा दिली होती, त्याचबरोबर अडीच एकर जमीन ग्रामपंचायतीने महावितरणला विद्युत प्रकल्पासाठी दिली आहे. तेथे वीज उपकेंद्र उभारण्यात आले आहे. याशिवाय पाच एकर जागा श्री कानिफनाथ गड देवस्थानला देण्याचे ग्रामपंचायतीचे पूर्वीचे नियोजन आहे.

 

तर अन्य शिल्लक जागा ग्रामपंचायतीने राखीव ठेवली आहे. मात्र, गेल्या वर्षभरात राजकीय नेत्यांनी गायरानाच्या पुणे-सासवड रस्त्यालगतच्या रिकाम्या जागेवर मालकी हक्क दाखवून पत्र्याची पक्की शेड उभी करून व्यवसाय सुरू केले आहेत. त्यानंतर ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे निवदेने देऊन ही अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीने वारंवार हरकती, ठराव घेऊन ही अतिक्रमणे थांबत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सामुहिकरित्या राजीनामे देण्याचे इशारे देऊनही काहीच फरक पडलेला नाही. प्रशासनाकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही.

सासवड-बापदेव-कोंढवा पुणे मार्गालगतच्या याच जागेत कानिफनाथ ट्रस्ट पंचकमिटीच्या नियोजित जागेचा बोर्ड होता. तो ही तोडून त्या ठिकाणी अनेकांनी रातोरात गाळे उभे करून व्यवसाय थाटले आहेत, त्यांना महावितरणकडून अनधिकृत वीज जोडही मिळत आहेत. या जागेवर राजरोसपणे अतिक्रमणे सुरू आहे. बोपगाव ग्रामपंचायतीकडून वारंवार सूचना केल्यानंतरही अतिक्रमणे हटलेली नाहीत. यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी काही दिवसापूर्वी या मोकळ्या जागेत सामूहिक आंदोलनही केले होते. या प्रकरणामुळे उद्योग धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेल्या येथील ग्रामस्थ, तरुणांनी फेसबुक, व्हाटस ऍपवर या अतिक्रमणाचा निषेध करीत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली असली तरी दुर्लक्ष होत असल्याचे कानिफनाथ देवस्थानचे विश्वस्त दीपक फडतरे तसेच माजी सरपंच योगेश फडतरे यांनी सांगितले. या संदर्भात पुरंदर, दौंडचे विभागीय अधिकारी संजय आसवले यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.