भर लोकसभेत राहुल गांधीनी घेतली मोदींची गळाभेट

नवी दिल्ली :रायगड माझा वृत्त

मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आज लोकसभेत वेगळंच नाट्य पाहायला मिळालं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र, त्याचवेळी मोदी किंवा भाजपबद्दल आपल्या मनात द्वेष नसल्याचं सांगत राहुल यांनी भर लोकसभेत मोदींची गळाभेट घेतली. त्यांच्या या मिठीची रसभरीत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी काय बोलणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यांचं भाषण होण्याआधीच भाजपकडून खिल्ली उडवणाऱ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. भूकंपासाठी तयार राहा, असं केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले होते. तर, राहुल गांधी आज स्पष्ट आणि व्यवस्थित बोलले तर जमीन हादरणारच नाही तर नाचेल, असा चिमटा अभिनेते, खासदार परेश रावल यांनी काढला होता. त्यामुळं राहुल यांच्या भाषणाकडं साऱ्याचंच लक्ष होतं.

अपेक्षेप्रमाणं राहुल यांनी भाषणात मोदी सरकार, भाजप व आरएसएसला लक्ष्य केलं. मोदींवर टीका करताना ते चुकल्यामुळं सभागृहात हास्यकल्लोळही उडाला. मात्र, तरीही त्यांनी भाषण सुरू ठेवत मोदी, शहा व भाजपवर हल्ला चढवला. ‘माझ्याविषयी भाजप, आरएसएस व मोदींच्या मनात राग आहे. त्यांच्या दृष्टीनं मी पप्पू आहे. ते माझ्याविषयी बराच अपप्रचार करतात. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल अजिबात द्वेष नाही,’ असं राहुल म्हणाले. हे बोलून झाल्यानंतर राहुल यांनी भाषण थांबवले आणि आपली जागा सोडून ते थेट मोदींच्या आसनापर्यंत गेले. सुरुवातीला कोणालाच काही कळलं नाही. मोदींच्या जागेजवळ जाऊन राहुल यांनी थेट त्यांची गळाभेट घेतली. त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. राहुल यांच्या या कृतीनं काही क्षण मोदीही गडबडले. मात्र, नंतर त्यांनीही स्मित करत राहुल यांना प्रतिसाद दिला.

भाजपची टीका

राहुल यांनी मोदींची गळाभेट घेतली असली तरी भाजपनं त्यांच्यावर टीका केली आहे. ‘राहुल गांधी यांनी संसदेचं मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद’, अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे. तर, राहुल यांच्या गळाभेटीवर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी बोचरा टोला हाणला आहे. ‘ही संसद आहे. मुन्नाभाईचा इलाका नाही. इथं ‘जादू की झप्पी’ चालणार नाही,’ असं त्या म्हणाल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत