भांडुप उड्डाणपुलावर भीषण अपघात; दोन ठार, तीन जखमी

 मुंबई : रायगड माझा 

साकीनाका येथे पार्टी करून घरी परतत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात पूर्व द्रुतगती महामार्गावरील भांडुप उड्डाणपुलावर शनिवारी सकाळी घडला. निहार गोळे (२२) आणि यश चौगुले (२१) अशी मृतांची नावे असून हे दोघे मावस भाऊ आहेत. तर हेमांग शिरगुंडे, अक्षय मोरे आणि महेश पद्मनाथन हे तिघे जखमी झाले.

ठाण्याच्या श्रीरंग सोसायटीमध्ये आणि तेथील आजूबाजूच्या परिसरात राहणारे १५ ते २० मित्र पाच कारमधून शुक्रवारी रात्री साकीनाका येथील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास हे सर्व पार्टी आटोपून निघाले. नवघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यांच्या तीन कार पुढे निघून गेल्या तर दोन मागे होत्या. यापैकी हेमांग चालवत असलेल्या होंडा सिटी कारवरील त्याचे नियंत्रण सुटले. भांडुप पंपिंग स्टेशन येथील उड्डाणपुलावरून उतरत असताना नियंत्रण सुटल्याने ही कार ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱया कंटेनरला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला. पुढे गेलेल्या मित्रांनी आणि कंटेनर चालकांनी पाच जखमींना मुलुंडच्या वोक्हार्ट रुग्णालयात नेले. पण निहार आणि यश यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला तर हेमांग, अक्षय आणि महेश यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, नवघर पोलिसांनी हेमांग याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हेमांग आणि त्याचे मित्रांनी दारू घेतली होती का? हे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

निहारचे नेत्रदान

या अपघात मृत्यू झालेल्या निहार गोळे यांच्या कुटुंबीयांनी त्याचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली. दरम्यान त्याचा मावस भाऊ यश हा मूळचा सांगलीचा असून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार होता. व्हिसाच्या कामासाठी तो मुंबईत आला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत