भाईंदरच्या पालिका रुग्णालयात गेल्या सात दिवसांत १५ ते २३ वयोगटातील पाच युवकांचा मृत्यु

भाईंदर : रायगड माझा वृत्त 

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भाईंदर पश्चिम टेंबा येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात गेल्या सात दिवसांत १५ ते २३ वयोगटातील पाच युवकांचा मृत्यु झाल्यामुळे महानगरपालिका प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या रुग्णालयात अत्यावश्यक सेवा देणारे साहित्य आणि पर्याप्त डॉक्टर तसेच नर्स आणि अन्य कर्मचारीवर्ग नसल्यामुळेच असे प्रकार घडले असा येथील नागरिकांचा आरोप आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सुरू करण्यात आलेले भाईंदर पश्चिम टेंबा येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय सुरू होण्यापूर्वी पासून वादाच्या भोवऱ्यात आहे. पालिकेची आर्थिक परिस्थिति चांगली नसल्यामुळे सदर हॉस्पिटल चालवणे अवघड आहे, अशी स्पष्ट कबुली पालिकेने न्यायालयात दिली होती. त्यामुळे सदर हॉस्पिटल राज्य शासनाद्वारे चालविण्याचा निर्णय झालेला आहे. याच रुग्णालयात सर्वप्रथम २४ जुलै रोजी आझाद शहनवाज अंसारी (१६) याचा मृत्यु झाला. यानंतर २८ जुलै रोजी एकाच दिवशी तीन जणांचा मृत्यु झाला यात उपेंद्र यादव (१७), विवेक लाड (२३) आणि संतोष थापा (१६) यांचा मृत्यु झाला. तर ३० जुलै रोजी उपेंद्र निषाद (१५) याचा मृत्यु झाला. यासंदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. प्रमोद पडवळ यांनी दिलेल्या माहिती नुसार आझाद अंसारी आणि उपेंद्र यादव यांचा मृत्यु हॉस्पिटल मधे आणण्यापूर्वीच झाला होता. तर विवेक लाड अपघातात गंभीर जखमी झालेला, आणि ब्रेन हॅमरेज मुळे त्याचा मृत्यु झाला. संतोष थापा आणि गोपी निषाद यांना हॉस्पिटल मधे भरती केले तेव्हा ताप आणि रक्ताच्या उलट्या होत होत्या, अशी माहिती दिली आहे.

दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून, या हॉस्पिटल मधे योग्य सोयी सुविधा नसल्यामुळेच असे प्रकार घड़तात, असा आरोप नागरिकांनी करतानाचा राज्य शासनाने यात लक्ष घालून १० लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरातील या हॉस्पिटल सुसज्ज करावे अशी मागणी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत