‘भाजपची सुराज्य यात्रा म्हणजे जनतेची थट्टा’-विखे पाटील

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मागील चार वर्षे महाराष्ट्रात कुराज्य आहे. त्यामुळे सत्तारुढ भाजपने काढलेली सुराज्य यात्रा ही जनतेची थट्टा आहे. मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपने जाहीर केलेच आहे. आता फडणवीस यांना रामाचा अवतार जाहीर करा, म्हणजे महाराष्ट्रात ‘रामराज्य’ अवतरेल, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी जनसंघर्ष यात्रेत केली.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत जालना येथील जाहीर सभेत ते बोलत होते. ‘राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत सुराज्य यात्रा काढली आहे. भाजपची सुराज्य यात्रा ४ दिवसांत एकूण १३ जिल्ह्यात फिरणार आहे. म्हणजे एका दिवसात कमीत कमी तीन जिल्हे फिरणार आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत एका जिल्ह्याला एक दिवससुद्धा कमी पडतो आणि भाजप एका दिवसात तीन-तीन जिल्हे फिरायला निघाली आहे. आम्ही अनेक यात्रा पाहिल्या, पण अशी बुलेट ट्रेनसारखी वेगवान यात्रा आजवर कधी पाहिली नव्हती. कदाचित ही यात्रा इतकी वेगात जाईल, की ती लोकांना दिसणार नाही’, असे विखे पाटील म्हणाले.

भाजप-शिवसेनेला १५ वर्षानंतर फक्त नशिबाने सत्ता मिळाली. चार वर्षांनंतर आपण काय केले, ते सांगण्यासारखे ठोस असे सरकारकडे काहीही नाही, अशी टीका विखे यांनी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, यंदाचा खरीप गेला असून, रब्बीसाठी जमिनीत ओल नसल्याने खरीप २०१८ मध्ये घेतलेल्या पीक कर्जासह शेतकऱ्यांचे सगळे कर्ज सरसकट माफ करा, अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत