भाजपच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला, तलवारीने केले वार, विद्यापीठ परिसरातील घटना

औरंगाबाद: रायगड माझा 

भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस संजय फकीरचंद फत्तेलष्कर (४७, रा. बेगमपुरा) यांच्यावर रविवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात अंगावर कार घालून व डोळ्यात मिरची पूड फेकत पाच जणांनी तलवारीने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बेगमपुरा पोलिस ठाण्यात सुरू होती. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

फत्तेलष्कर हे सायंकाळी विद्यापीठात वॉकिंगसाठी गेले होते. तेथून घराकडे परतत असताना वसतिगृह क्रमांक दोनच्या समोर कारने आलेल्या पाच जणांनी त्यांना धडक दिली. ते खाली पडताच त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर दहा ते बारा वार केले. फत्तेलष्कर यांनी सगळे वार हातावर झेलल्याने त्यांची बोटे निकामी झाली. त्यांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोरांनी धूम ठोकली. याच वेळी तेथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत घाटीत दाखल केले. घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा परिसरातील तरुणांनी घाटीत धाव घेतली. दरम्यान, फत्तेलष्कर यांनी हल्लेखोरांना ओळखले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते. घाटीत उपचार घेतल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत