भाजपच्या महिला आमदाराच्या मंदिर प्रवेशावरून गोंधळ , गंगाजल टाकून केलं शुद्धीकरण

हमीरपूर:रायगड माझा वृत्त 

उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यात भाजपच्या महिला आमदार मनिषा अनुरागी यांच्या मंदिर प्रवेशावरुन राडा झाला आहे. येथील महाभारत काळातील धूम ऋषिंच्या मंदिरात महिलांना प्रवेशास मनाई असतानाही अनुरागी मंदिरात गेल्या. यामुळे चिडलेल्या मंदिरातील कर्मचाऱ्यांनी गावावर आता दैवी प्रकोप होणार असा आरोप केला. यामुळे संतप्त झालेल्या अनुरागी समर्थकांनी मंदिर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. अखेर इतरांनी मध्यस्थी करत सगळ्यांना शांत केले. त्यानंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी संपूर्ण मंदिरात गंगाजळ टाकून शुद्धीकरण केलं. एवढेच नाही तर धूम ऋषिंची मूर्ती अलाहाबाद येथे नेऊन तिचेही शुद्धीकरण करण्यात आले.

पांडवाचे गुरू धूम ऋषी यांचे हे आश्रम असल्याची आख्यायिका आहे. अज्ञातवासात असताना पांडव, कुंती व द्रौपदी या आश्रमात येऊन राहिले होते. पण धूम ऋषिंनी कुंती व द्रौपदी यांना आपल्या कुटीत येण्यास मनाई केली होती. ऋषि येथून गेल्यानंतर त्यांच्याच कुटीत ग्रामस्थांनी मंदिर उभारले. पण धूम ऋषिंची परंपरा कायम ठेवत येथे महिलांना प्रवेशास मनाई केली. जर धूम ऋषिंच्या मंदिरात महिलांनी प्रवेश केला तर गावावर दैवी प्रकोप होईल अशी येथील नागरिकांची धारणा आहे. पण काही दिवसांपू्र्वी येथील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी अनुरागी आल्या होत्या.

कार्यक्रम झाल्यानंतर त्या थेट धूम ऋषिंच्या मंदिरात गेल्या. यामुळे येथे गोंधळ उडाला. मंदिराचे नियम अनुरागी यांनी तोडल्याने मंदिर प्रशासन त्यांच्यावर नाराज झाले आहे. अखेर गंगाजल टाकून मंदिर व धूम ऋषिंच्या मूर्तिचे शुद्धीकरण करण्यात आले. पण याचदरम्यान या भागात तूफानी पाऊस झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत