भाजपच्या मित्रपक्षांची वेगळी आघाडी; आठवले, राणे, खोत, मेटे, जानकर एकत्र येणार?

जागा वाटपात मित्रपक्षांना स्थान देण्याबाबत अजूनही भाजपमध्ये स्पष्टता दिसत नसल्याने मित्रपक्षाच्या नाराज नेत्यांनी नवी आघाडी उघडण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. या नव्या आघाडीत रामदास आठवले, नारायण राणे, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत आदी नेते एकत्र येण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई : शिवसेनेसोबत युती करताना तसेच लोकसभा निवडणुकीसाठी युतीचे जागा वाटप जाहिर करतानाही भाजपने मित्रपक्षांना विश्‍वासात घेतलेले नाही, अशी नाराजी मित्रपक्षांच्या नेते आता जाहिरपणे व्यक्त करू लागले आहेत.

शिवसेना भाजपने युती करण्यापूर्वी मित्रपक्षांना डावलल्याची भावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभेची जागा लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपने डावलल्यानंतर रत्नागिरी सिंधूदूर्ग मतदार संघातून नारायण राणे यांनी निलेश राणे यांची उमेदवारी जाहिर केली आहे.

राज्यात लोकसभेच्या अन्य जागाही महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष लढविणार असल्याची घोषणा त्यांनी केली. भाजपने दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी न दिल्यास आठवले हे ईशान्य मुंबईतून लढण्याची शक्‍यता आहे. दुखावलेले मित्र पक्षाचे सर्वच नेते एकत्र येण्याची शक्‍यता असून आज नव्या आघाडीसाठी जानकर यांच्या मुंबईतील बंगल्यावर मित्रपक्षाच्या नाराज नेत्यांची बैठक झाली.

दुखावलेले नेते भाजपसह शिवसेनेवर नाराज आहेत. शिवसेनेमुळेच जागा वाटपात आम्हा स्थान मिळाले नसल्याची भावना मित्रपक्षाच्या नेत्यांची आहे. त्यामुळे निवडणूकीत शिवसेनेवर त्यांची मोठी नाराजी आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत असताना भाजपच्या मित्र पक्षांची नवी आघाडी निर्माण झाल्यास शिवसेना भाजप युती आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अडचणीचे ठरण्याची शक्‍यता आहे. या नव्या आघाडीत सेना भाजप युती आणि दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीत स्थान नसलेल्या आणि दुखावलेल्यांना स्थान असेल अशी व्युव्हरचना सुरू केला जात असल्याचे समजते.

राज ठाकरेंची घेणार मदत 
भाजपच्या मित्र पक्षांची नवी आघाडी तयार झाल्यास मराठी मतांची मोट बांधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची तयारी मित्रपक्षाच्या नेत्यांनी केल्याचे समजते. भाजपने उमेदवारी न दिल्यास दुखावलेले नेते राज ठाकरे यांना लवकरच भेटणार असल्याचे समजते. राज ठाकरे यांना आघाडीत घेवून मतांचे विभाजन टाळण्यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीत राज ठाकरे यांना घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्नशील असले तरी कॉंग्रेसचे नेते अनुकूल नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज यांची नव्या आघाडीसाठी मदत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत