भाजपच्या विकृतीमुळे महाराष्ट्र धर्म बुडाला: उद्धव ठाकरे

मुंबई : रायगड माझा वृत्त 

श्रीकृष्ण जन्मदिनीच भाजप आमदाराने नवे ‘महाभारत’ लिहिले व त्यावर भाजपचा एकही तोंडाळ पुढारी बोलायला तयार नाही. एरव्ही विरोधकांनी जनतेच्या व देशाच्या प्रश्नांवर आवाज उठवला तरी त्यांना देशद्रोही ठरविण्यासाठी जिभेचे पट्टे चालविणारे स्त्रियांना पळवून नेणाऱ्या आपल्या आमदाराच्या बेताल बडबडीवर तोंड शिवून बसले आहेत’, असा घणाघात करतानाच ‘महाराष्ट्र धर्म बुडाला तो औरंगजेबामुळे नव्हे, तर भाजपच्या विकृतीमुळे’, अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

‘एखादी मुलगी पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा. तिला पळवून आणण्यात मी मदत करेन’, असं वादग्रस्त विधान भाजपचे आमदार राम कदम यांनी केलं होतं. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून कदम यांच्यासह भाजपवर शरसंधान साधलं आहे. ‘कदम यांच्या वक्तव्याविरोधात राज्यातील महिला रस्त्यांवर उतरल्या आहेत. अर्थात त्याचे राजकारण करू नका, तर ही विकृतीच मुळापासून उखडून फेका. लिंगपिसाटांचे राजकारण संपवायला हवे. महिलांनी एकीचा इतिहास घडवावा. त्यांनी एकत्र यावे व सगळ्यात मोठा दणका द्यावा’, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले…

>> आजच्या युगातही भाजपच्या ‘खिलजी’विरोधात जोहार पत्करण्याची वेळ महाराष्ट्रातील तमाम मायभगिनींवर आली आहे काय? भाजपचे एक आमदार व मुख्यमंत्र्यांचे प्रिय ‘हराम’ कदम यांनी स्त्रीयांच्या बाबतीत अर्वाच्य, मानहानीकारक शब्द उच्चारून मस्तवालपणाचे प्रदर्शन केले आहे.

>> ही कसली भोगशाही आमच्या महाराष्ट्रात अवतरली आहे? आई-भगिनी, शेतकरी, सीमेवरील जवानांच्या पत्नींबाबत घाणेरडय़ा शब्दांत उद्धार करणारी जमात भारतीय जनता पक्षात रुजली आहे. रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना मस्तवाल व साले लबाड म्हणाले. पंढरपूरचे भाजप आमदार प्रशांत परिचारकांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या बायकांबाबत घाणेरडे विधान केले. त्या सगळ्यांवर आमदार कदम यांनी कळस चढवला आहे. दुसऱ्यांच्या बायका, लेकी, सुना पळवून आणू असे सांगणारा आमदार ज्या पक्षात आजही आहे त्यांना शिवरायांचे नाव घेऊन राज्य करण्याचा अधिकार नाही.

>> महाराष्ट्राच्या तरुण पिढीस कोणता विकृत संदेश भाजप देत आहे? हेच त्यांचे हिंदुत्व आणि हीच त्यांची संस्कृती आहे काय? निवडणुका जिंकण्याच्या लोभापायी कचरा अंगास फासला की दुसरे काय व्हायचे? गेल्या पाच वर्षांत जे पेरले तेच उगवले आहे. महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीचा संताप अनावर झाला आहे.

>> पंतप्रधान मोदी हे तिहेरी तलाक प्रकरणात मुसलमान स्त्रीयांना न्याय द्यायला निघाले आहेत व इथे महाराष्ट्रात स्त्रीवर्गात भाजपच्या आमदारांमुळे घबराट पसरली आहे. मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री पंकजा मुंडे यांनी तरी यावर बोलावे. स्त्रीयांच्या हक्कांसाठी टी.व्ही.च्या पडद्यावर ताडताड बोलणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तरी कोठे आहेत?

>> ज्या महाराष्ट्राने जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई जन्मास घातल्या त्याच महाराष्ट्रात ‘नारी’ म्हणजे भोग व कचरा. कुठूनही उचला व कुठेही फेका, असे बोलले गेले. पुन्हा यावर सत्ताधारी पक्ष मूग गिळून गप्प बसला आहे. हे मौनही संतापजनक आहे. स्त्री ही कुणाची माता, कुणाची भगिनी, कुणाची पत्नी आहे. कुणीही तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहावे व राम कदमांसारख्यांनी स्त्रीयांना पळवण्याची भाषा करावी! हा सगळाच प्रकार घृणास्पद आणि लज्जास्पद आहे. 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत