भाजपने घेतली पराभवाची धास्ती

रामटेक - संघर्ष यात्रेदरम्यान रामटेक येथे घेण्यात आलेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे, नसीम खान यांचा जिल्हा काँग्रेसतर्फे जंगी सत्कार करताना राजेंद्र मुळक. यावेळी उपस्थित सुनील केदार.

रामटेक : रायगड माझा वृत्त

साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पुन्हा सरकारने जुमलेबाजी सुरू केली असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला नागपूर येथून सुरुवात झाली असून सायंकाळी रामटेक येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. कामाच्या जोरावर लोकांकडे मते मागायची सोय आता सरकारकडे राहिली नाही. त्यामुळे सरकारच्या खुशमस्कऱ्या सुरू झाल्या आहेत. ज्या घोषणा सरकारतर्फे केल्या जात आहेत त्या न्यायालयात न टिकणाऱ्या आहेत तर काही विधेयके राज्यसभेत पारित होणारे नाहीत. तीन राज्यांतील निवडणुकीत झालेल्या पराभवाची धास्ती सरकारने घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, अद्याप शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नाही. याउलट मध्य प्रदेशात सत्ता स्थापन झाल्याबरोबर पहिल्याच दिवशी कर्जमाफीची घोषणा करून काँग्रेसने शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला.

व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आ. नसीम खान, वसंत पुरके, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशीष दुआ, आमदार सुनील केदार, माजी मंत्री व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी आ. मुझफ्फर हुसेन, मुनाफ हकीम, अमोल देशमुख, अनंतराव घारड, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्‍याम उमाळकर, प्रकाश सोनावणे, रामकिशन ओझा, सचिव तौफिक मुल्लाणी, शाह आलम शेख, चंद्रपाल चौकसे आदी उपस्थित होते.

समविचारी पक्षांची महाआघाडी
मागील निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट झाल्यामुळे भाजपला फायदा झाला. आता राज्यात समविचारी पक्षांची महाआघाडी करून भाजपला पराभूत करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत