भाजपने राज्यपालांकडे मागितली सात दिवसांची मुदत

काँग्रेस-जेडीएसला काटशह देण्यासाठी भाजपाचा ‘मास्टरस्ट्रोक’

कर्नाटक : रायगड माझा वृत्त |

बेंगळुरूः कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस-जेडीएस एकत्र आले असताना, त्यांना काटशह देण्यासाठी भाजपाही सज्ज झाला आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनी राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे १८ तारखेला शपथ घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस-जेडीएसला वाट पाहावी लागू शकते.

काँग्रेसचे सात आणि जेडीएसचे चार आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून भाजपाने प्रतिस्पर्ध्यांची चिंता वाढवली आहे. कर्नाटकच्या निकालात कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. भाजपाला ‘मॅजिक फिगर’नं थोडक्यात हुलकावणी दिलीय. त्यामुळे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. भाजपाला सत्तेचं गणित जमवणं तितकंसं सोपं नसल्याचं लक्षात येताच, काँग्रेसच्या ‘चाणक्यां’नी वेगळं समीकरण मांडलं आणि जेडीएसकडे ‘टाळी’ मागितली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष कुमारस्वामींना थेट मुख्यमंत्रिपदाचीच ऑफर दिल्यानं त्यांनीही लगेचच ती स्वीकारली.

या घडामोडींनंतर, भाजपाश्रेष्ठीही कामाला लागले आणि ‘सगळे निकाल येईपर्यंत वाट पाहा’ म्हणणारे बीएस येडियुरप्पा राज्यपाल वजुभाई वाला यांना भेटायला पोहोचले. आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करू, त्यासाठी आम्हाला आठ दिवसांची मुदत हवी, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केलीय. त्यांच्यापाठोपाठ, कुमारस्वामींनीही राज्यपालांची भेट घेतली. काँग्रेस आणि जेडीएसनं राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे ११८ आमदारांचा पाठिंबा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता राज्यपाल काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल. पण, सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला ते आधी संधी देतील, अशीच चिन्हं आहेत.

 

Image result for वजुभाई

राज्यपाल वजुभाई वाला ठरणार किंगमेकर

वजुभाई वाला हे गुजरातमधील ज्येष्ठ भाजपा नेते आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले वजुभाई हे स्वाभाविकच मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. २००१ मध्ये त्यांनी आपला मतदारसंघ मोदींसाठी सोडला होता. त्यानंतर तब्बल नऊ वर्षं ते गुजरातमधील मोदी सरकारचे अर्थमंत्री होते. त्याआधीही त्यांनी हे खातं समर्थपणे सांभाळलं होतं. तब्बल १८ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, सप्टेंबर २०१४ मध्ये वजुभाईंची नियुक्ती कर्नाटकचे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. आता, खऱ्या अर्थानं तेच कर्नाटकमधील ‘किंगमेकर’ ठरताना दिसताहेत.  

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत