भाजपमध्ये जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही

आनंदराव पाटील यांची टीका

सातारा : रायगड माझा

आघाडी सरकारच्या कालावधीत सत्ता भोगल्यानंतर आता व्यक्तीगत फायद्यासाठी ते भाजपमध्ये जाणार असतील तर त्यांचा आम्ही निषेध करूच त्याचबरोबर जनता देखील त्यांना कदापि माफ करणार नाही, अशी टीका कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.आनंदराव पाटील यांनी भाजपच्या वाटेवर असलेल्या खासदार व आमदारांवर केली.

जिल्हा कॉंग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी रजनी पवार, धनश्री महाडिक, रविंद्र झुटींग आदी.पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ.पाटील यांनी कर्नाटक निवडणूकीच्या निकालानंतर भाजपच्या वाटेवर असलेल्या आमदारांसाठी एक संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाला असल्याचा उल्लेख केला. त्यावर भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या दाव्यानुसार जिल्ह्यातील आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी त्यांनी टिका केली. पुढे त्यांनी भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आ.नरेंद्र पाटील यांच्यावर कडाडून टिका केली. ते म्हणाले, आज पाटण तालुक्‍यातील आ.नरेंद्र पाटील यांच्याकडून मुंद्रुळकोळेची ग्रामपंचायत आमच्या पक्षाचे हिंदुराव पाटील यांनी ताब्यात घेतली आहे. खरे तर पाटण तालुक्‍यात राष्ट्रवादीचे तत्कालिन आमदार विक्रमसिंह पाटणकर यांना बळ मिळावे या हेतूने राष्ट्रवादीने नरेंद्र पाटील यांना आमदार केले होते. मात्र, त्यांच्या आमदार होण्याने उलट पाटणमधील आमदारांचा पराभव झाला. आता तर ते माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्याच्या नावाखाली आता भाजपमध्ये जावू पाहत आहेत, अशी टिका आ.पाटील यांनी केली. साताऱ्यात आयोजित राजधानी महोत्सवासाठी आपल्याला निमंत्रण होते मात्र काही कामामुळे येवू शकलो नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मेडीकल कॉलेजसाठी आवाज उठविणार

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडसह जिल्ह्यात अनेक ठीकाणी विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. मात्र, साताऱ्यातील मेडीकल कॉलेज जागेच्या कारणामुळे होवू शकले नाही. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडीकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी येत्या अधिवेशनात विधानपरिषदेत आवाज उठविणार आहे, असे आ.पाटील यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत