भाजपमध्ये संताप : आता युती नकोच!

मुंबई : रायगड माझा वृत्त

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील भाषणाचे तीव्र पडसाद भारतीय जनता पक्षात उमटले असून, यापुढे युतीची बोलणी करू नका आणि तसा आग्रह धरू नका, असा संदेश दिल्लीतील भाजप नेत्यांनी प्रदेश भाजपला दिला असल्याचे समजते.

आता युती होणार नाही, असे समजून स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करा, असा निरोपच दिल्लीहून आल्याचे प्रदेश भाजपमधील सूत्रांनी  सांगितले. उद्धव यांनी अलीकडेच केलेल्या अयोध्या दौर्‍यातून मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतरही भाजपने काहीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पंढरपूरच्या सभेत मात्र ‘चौकीदार चोर है’, असे म्हणत मोदी यांच्यावर ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली. ‘जागावाटप गेले खड्ड्यात, आधी शेतकर्‍यांचे काय ते बोला’, असा सवालदेखील केला.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती न झाल्यास दोन्ही पक्षांना फटका बसेल, असे अनेक सर्व्हेंमधून दिसून आले आहे. त्यामुळेच भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या पक्षाच्या राज्यातील नेत्यांना सेनेवर टीका करू नका, असा सल्ला दिला होता. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी आपल्या टीकेची धार अधिक तीव्र केल्याने युतीतील तणाव वाढला.

उद्धव यांच्या या भाषणाची गंभीर दखल भाजपच्या नेत्यांनी घेतली असून, आम्ही योग्यवेळी उद्धव यांना प्रत्युत्तर देऊ, असे सूचक वक्‍तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत