भाजपला घरचा आहेर! मुंबईत आंदोलन

मुंबई : रायगड माझा वृत्त

निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाल्यानंतर स्थानिक नेत्यांनी आता कामांचा धडाका लावत प्रतिमा उजळणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत तर भाजप नेत्याने वॉर्डातील काम करुन घेण्यासाठी स्वत:च्याच सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा देत घरचा आहेर दिला आहे. मुंबईच्या मालाड येथे भाजप कार्यकर्त्यांनी फूटओव्हर ब्रिजचं काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आठवड्याभरात पुलाच्या दुरूस्तीचं काम न झाल्यास आंदोलनचा इशारा दिला आहे.

मालाडच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा पूल गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. या भागातील भाजपचे माजी नगरसेवक विनोद शेलार यांनी परिसरात बॅनरबाजी करत पूल येत्या सात दिवसात सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. मालाडच्या या पुलाचा एक भाग महापालिकेच्या अखत्यारीत येतो, तर उर्वरित भाग पश्चिम रेल्वेच्या अख्यत्यारीतील आहे. अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर खबरदारी म्हणून बंद करण्यात आलेल्या पुलांमध्ये मालाडच्या पुलाचा समावेश आहे.

भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनीही सरकारवर टीका केली आहे. ‘सत्ताधारी पक्षाचा सदस्य असल्याची सर्वप्रथम मी माफी मागतो. पुलाच्या दुरुस्तीत होणारी दिरंगाई आणि राजकीय अनास्था ही लाजिरवाणीबाब आहे. संबंधित विभाग माझ्या अखत्यारीत येत नसला तरी मी पुलाची पाहणी करणार आहे. पूल सुरू न झाल्यास मी देखील आंदोलनात सहभागी होणार आहे’, असा स्पष्ट इशारा गोपाळ शेट्टी यांनी दिला आहे.

दरम्यान, विनोद शेलार यांनी ते नगरसेवक असतानाच्या काळात या पुलाचं दुरूस्तीचं काम काही प्रमाणात झालं होतं असा दावा केला आहे. मात्र निधी अभावी उर्वरित काम पुढे ढकलण्यात आलं होतं, असं शेलार म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत