भाजपला धक्का; रालोआ सोडण्याचे अकाली दलाचे संकेत

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच भाजपला सहकारी पक्षांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने रालोआतून बाहेर पडण्याचे संकेत दिल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. अकाली दल रालोआतून बाहेर पडल्यास पंजाबमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो. भाजपकडून गुरुद्वारामध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत अकाली दलाने नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी झालेल्या एनडीएच्या घट पक्षांच्या बैठकीत अकाली दलाचे नेते सहभागी झाले नव्हते. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत.

नांदेडमधील हजूर साहेब गुरुद्वारा शिखांसाठी महत्त्वाचा असून त्यात भाजपचा हस्तक्षेप वाढला आहे. भाजपला शिखांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. भाजपकडून अशीच मनमानी सुरू राहिली तर आम्ही त्यांची साथ सोडू असा इशारा अकाली दलाचे प्रवक्ते आणि खासदार नरेश गुजराल यांनी दिला आहे. आमच्यासाठी रालोआ महत्त्वाचे नाही. आम्हांला सत्ता आणि पद यांचाही मोह नाही. आमदार, खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. आमच्यासाठी गुरुद्वारा सर्वोच्च असून त्यात कोणाचाही कोणताही हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. भाजपच्या अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे शीख बांधव नाराज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भाजप नेत्यांनी अल्पसंख्याकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये, आमच्यासाठी गुरुद्वारा सर्वोच्च आहे. बिहार, महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशात भाजप सरकारकडून गुरुद्वारामध्ये हस्तक्षेप करण्याचे प्रकार घडत आहेत. या गुरुद्वारांवर ताबा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोपही अकाली दलाने केला. भाजपने हस्तक्षेप थांबवला नाही तर रालोआमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा अकाली दलाचे नेते मनजिंद्रसिंह सिरसा यांनी दिला आहे.

भाजप- अकाली दलातील या तणाव वाढला असतानाच अकाली दल गुरुवारी सकाळी झालेल्या रालोआच्या बैठकीत सहभागी झाला होता. मात्र, संध्याकाळी बोलावलेल्या घटक पक्षांच्या बैठकीत पक्षाचे नेत उपस्थित नव्हते. यावर महत्त्वाच्या कामामुळे अकाली दलाचे नेते गैरहजर असल्याची सारवासारव भाजपकडून करण्यात आली. मात्र, अकाली दल भाजपची साथ सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत