भाजपला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही; शरद पवार यांची टीका

मुंबई : रायगड माझा वृत्त

निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळाला तोंड द्यावे लागते. गेले काही महिने महाराष्ट्रात हे चित्र दिसून येत आहे. दुष्काळी भागातील शेतकऱयांचे स्थलांतर होत आहे. पोटाची आग विझवण्यासाठी दुष्काळग्रस्त मुंबईची वाट धरीत आहेत. सरकार कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज भाजप सरकारवर तोफ डागली.

अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी हक्क परिषदेत शरद पवार बोलत होते. या वेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, गेली चार वर्षे देश चुकीच्या माणसांच्या हातात आहे. भाजप सरकारला शेती, शेतकऱयांबद्दल आस्था नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात नसल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सर्व विरोधक एकसंध राहिले तर देशातील चित्र बदलू शकते, असे शरद पवार म्हणाले.

नवी दिल्लीत ‘लाँगमार्च’
मोदी सरकार देशभरात शेतकऱ्यांकडून जमिनी हिसकावून घेण्याचे काम करत आहे. शेतमालाला दर मिळत नाही. कर्जाची परतफेड होत नाही. त्यामुळे देशात चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर 29 व 30 नोव्हेंबरला नवी दिल्लीत लाँगमार्च काढत आहोत. येत्या निवडणुकीत शेतकरी हाच प्रचाराचा मुद्दा असेल, असे अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव हन्नन मोल्ला यांनी सांगितले.

शेतकऱयांच्या आत्महत्यांत महाराष्ट्र आघाडीवर
भाजपचे हे सरकार शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांचे नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात सर्वांनी एकत्र आलेच पाहिजे. ही परिषद राज्याच्या आगामी राजकारणाचे भवितव्य ठरवणारी आहे. राज्याचे आर्थिक नियोजन ढासळले आहे. विकासात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आता शेतकऱयांच्या आत्महत्यांत आघाडीवर आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. कॉम्रेड नरसय्या आडाम, शेकापचे जयंत पाटील आदींची भाषणे झाली. या परिषदेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावीत आदी या वेळी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत