भाजपविरोधी सर्वपक्षीयांची मोट!

वडगाव नगरपंचायत निवडणूक : तिसऱ्या आघाडीने “भाजप’ची बिघाडी 

रायगड माझा वृत्त 

केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाविरोधात सर्वपक्षीय मोटबांधणी भाजपला धक्‍का देणारी ठरली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वाटेल त्या वाटाघाटी सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. मावळ तालुक्‍यातील वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या निवडणुकीत असाच फॉर्म्युला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना यांनी भाजपविरोधात मोट बांधली.वडगाव-कातवी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. मावळ म्हणजे भाजप असे 25 वर्षे समीकरण आहे. मात्र नजीकच्या राजकीय घडामोडींमुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला चांगलाच घाम फुटला. अल्पकाळासाठी भाजपवासी झालेल्यांनी ऐन लढाईत भाजपच्या हातावर तुरी दिल्या. त्यात नाराजांची भर पडली आणि बंडखोरीमुळे पक्ष अडचणीत सापडला.

राज्यातील सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायत करण्यासंदर्भात राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर गेली साडेचार वर्षे वडगावकर नगरपंचायतीच्या प्रतीक्षेत होते. मावळ तालुक्‍यात तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषद आहे. आता नव्याने तालुक्‍याचे गाव असलेल्या वडगाव-कातवीचा त्यामध्ये समावेश झाला. तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषदेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष आहेत. आता वडगाव नगरपंचायतही ताब्यात घेण्याचे मनसुबे असले तरी भाजपविरोधात सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. राज्यात सत्तेचे वाटेकरी असलेली व पुढील काळात स्वबळाचा नारा देणारी शिवसेना या निवडणुकीत भाजपसोबत नाही.

नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत, त्यामध्ये मयूर ढोरे, देविदास जाधव, झहीर सोलकर, मनोज ढोरे, भास्करराव म्हाळस्कर, पंढरीनाथ ढोरे यांचा समावेश आहे. नगरसदस्य पदाच्या 17 जागांसाठी 47 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे दीपक कोकाटे, राहुल घुले, प्रतीभा ढोरे आणि मंदा पोटे असे चार उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दोन गट वेगवेगळ्या आघाड्यांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासह चार प्रभागांत एकमेकांसमोर ठाकले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस दुभंगली!
मित्रपक्षांनी एकत्र घेत भाजपला धडा शिकवण्यासाठी पक्षांतर्गत कुरघोड्या थांबवा आणि एकत्र येत निवडणुकीला सामोरे जावे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फाटाफूट झाली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे हे तिसऱ्या आघाडीत सामील झाले. उर्वरित गट सर्वपक्षीय आघाडीसोबत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात गावकी-भावकी एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे.

भाजपला असाही दगाफटका
दीड महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडून भाजपवासी झालेले पंढरीनाथ ढोरे यांना भाजपने मिकीट नाकारल्याने त्यांना बंडाचा झेंडा फडकावत आपल्या समर्थकांसह सवतासुभा थाटला. त्यामुळे भाजपची कमालीची गोची झाली आणि भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविणारे तीन उमेदवारांची भाजप आपले म्हणत असले तरी ते सर्व मनाने पंढरीनाथ ढोरे यांच्या तिसऱ्या आघाडीत आहेत. त्याचा फटका भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार भास्करराव म्हाळसकर यांना बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. भाजपमध्ये नगराध्यक्षपदासह सहा प्रभागांमध्ये बंडखोरी झाली आहे.

कॉंग्रेसचा एक गट भाजपच्या मुशीत
गेल्या कित्येक वर्षांतील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कलहातून सुटका करीत मावळवासियांना धक्‍का देत ज्येष्ठ नेते माउली दाभाडे समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. त्यामुळे कॉंग्रेसला काहीअंशी बळ मिळाले आणि सर्वपक्षीयांसोबत अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि अपक्षांसोबत आहेत. पण तरीही कॉंग्रेसचा नवा गटाला सर्वपक्षीयांची सोबत रुचलेली नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे “नवखे’ खेळाडू भाजपच्या मुशीत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गणिते जुळवताना भाजपला घाम फुटला
तळेगाव आणि लोणावळा नगरपरिषदेत भाजपची सत्ता आहे, पंचायत समितीवर “कमळ’ डोलताना दिसते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नाराज पंढरीनाथ ढोरे यांनी श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडीच्या रुपाने भाजपला धक्‍का दिला आणि तीन उमेदवार तिसऱ्या आघाडीत नेले. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपच्या उमेदवार रुक्‍मिणी गराडे यांनी ऐनवेळी माघार घेत पेच निर्माण केला.

भाजपची अशीही कुटनीती
पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर यांचे वाहनचालक झहीर सोलकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. आता सभापती भाजपचे आणि भाजपचे उमेदवार भास्करराव म्हाळसकर त्यामुळे नक्‍की कोण कोणाला मदत करणार? हाच चर्चेचा विषय झाला आहे. भाजपचेच असलेले मनोज ढोरे यांनी बंडखोरी केली. सभापतींचा वाहनचालक नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहे आणि भास्करराव म्हाळसकर हे भाजपचे उमेदवार अशी गोंधळाच्या स्थितीत भाजप निवडणूक प्रचार करीत आहेत.

अधिवेशन सोडून आमदार भेगडे प्रचारात
विधानसभा निवडणूक जिंकत 25 वर्षे भाजपची सुभेदारी म्हणून राज्यात नावाजलेल्या मावळातील वडगाव नगरपंचायत निवडणूक कमालीची चुरशीची झाली आहे. बंडखोरी, दगाफटका आणि उमेदवारांच्या पळवापळवीमुळे भाजपसाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता आमदार बाळा भेगडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. नागपूर येथे पावसाळी अधिवेशन सोडून ते प्रचारात उतरले आहेत.

नगरसदस्य पदाकरिता सर्वच्या सर्व जागा कोणताही राजकीय पक्ष लढवत नाही. विशेष म्हणजे भाजपलाही 17 जागांवर उमेदवार देता आले नाहीत. वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे मावळवासियांचे लक्ष लागले आहे. सर्वपक्षीयांची बांधलेली मोट, ऐनवेळी गठीत झालेली तिसरी आघाडी, भाजपला राजकीय लाथाळ्यांमध्ये मतदार कोणाला कौल देतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत