भाजपाला हादरा देण्याचा आमदार अनिल गोटेंचा इशारा 

धुळे : रायगड माझा वृत्त

गुंडगिरीची पार्श्‍वभूमी असलेल्यांना पक्षात प्रवेश नको, या प्रमुख अटीवर आपल्या भाजप पक्षाविरुद्ध आमदार अनिल गोटे यांनी बंडाचा इशारा दिलाय. महापालिका निवडणुकीत लोकसंग्राम संघटनेच्या बॅनरखाली उमेदवार उभे करणार असून उद्या महाराष्ट्र हादरवेल आणि  त्यानंतरही पक्षाने ऐकले नाही तर देश हादरवेल, असा इशारा गोटे यांनी भाजपला उद्देशून संपलेल्या प्रचार सभेतून दिला.

धुळे महापालिका निवडणुकीत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने अटी मान्य न केल्याने आणि आपल्या उमेदवारांसाठी “एबी फॉर्म’ही न दिल्याने आमदार गोटे यांनी स्वतंत्रपणे लोकसंग्राम संघटनेच्या बॅनरखाली सर्व 74 जागा लढविण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर बुधवारी रात्री आठनंतर त्यांनी शहरातील चितोड नाक्‍यावर प्रचार सभा घेतली.

महापालिकेची निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली लढवावी, अशा विचारात होतो. परंतु, स्व-पक्षातील विरोधकांनी इतर पक्षांतील गुंडांना प्रवेश दिला गेला. भाजपाचे बहुसंख्य उमेदवार हे आयात गुंड आहेत. त्यामुळे विरोधी पक्षात आता गुंडच शिल्लक राहिलेले नाहीत, अशा खोचक शब्दात आमदार गोटे यांनी भाजपावरच  टीकेची झोड उठवली . पक्षाने आपले म्हणणे न ऐकल्याचा संदर्भ देत त्यांनी उद्या महाराष्ट्र हादरवणार आहे, त्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यानंतरही ऐकले नाही, तर रविवारी देश हादरवणार आहे. चार राज्यांच्या निवडणुका आहेत, हे लक्षात ठेवा असा इशाराही आमदार गोटे यांनी एकप्रकारे दिला.आता अनिल गोटेंचा हा इशारा भाजपा किती गांभीर्याने घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत