भाजपा नेत्यांसाठी वेड्यांचे रुग्णालय सुरु करा : धनंजय मुंडेंचा टोला

मुंबई : रायगड माझा वृत्त 

शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या पूनम महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून पूनम महाजन यांनी केलेली टीका निषेधार्ह आहे. भाजपा नेत्यांचा सुरू असलेला वाचाळपणा पाहता त्यांच्यासाठी आता वेड्यांचे मोफत रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष पूनम महाजन यांनी चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर आयोजित केलल्या युवा महासंगम जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पूनम महाजन यांनी विरोधकांच्या महागठबंधनला महाठगबंधन असे संबोधून शरद पवार यांना शकुनी मामा म्हणून त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून बुधवारी धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन भाजपावर निशाणा साधला.

‘शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर पूनम महाजन यांनी केलेली टीका निषेधार्ह आहे. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही. पवार साहेबांवर टीका करणारे राजकीयदृष्ट्या संपून गेले आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे’, असे मुंडे यांनी म्हटले आहे. ‘भाजपा नेत्यांचा सुरू असलेला वाचाळपणा पाहता त्यांच्यासाठी आता मोफत वेड्यांची हॉस्पिटल सुरू करण्याची गरज आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावले. ‘अहो चिऊ ताई… महाभारत, रामायण यांचे कथानक राहु द्या… देश की जनता यह जानना चाहती है ?, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?, असा सवाल या बॅनरद्वारे विचारण्यात आला होता. आपल्या वडिलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे. तेव्हा आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार… सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत