भाजप आमदार मुटकुळेंच्या श्रेयवादाचा डाव शिंदेंनी उलटवला

हिंगोली : रायगड माझा वृत्त

जिल्ह्यात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार तानाजी मुटकुळे आणि भाजप नेते रामरतन शिंदे जवळेकर यांच्यातील गटबाजी व वादाने जाहीर स्वरुप घेतले आहे. आमदार मुटकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मी मंजुर करुन आणलेली कामे शिंदे हे स्वत: मंजुर करुन आणल्याचे सांगत आहेत, असा वार केला. त्यावर पलटवार करत रामरतन शिंदे यांनी लगोलग आमदार मुटकुळे यांनी मंजुर करुन आणलेली कामे वेगळी व मी मंजुर केलेली विकासकामे वेगळी असे म्हणत पुरावा दाखल कागदपत्रेच माध्यमांसमोर सादर केली. मुटकुळेंच्या श्रेयवादाचा डाव शिंदेंनी उलटविल्यामुळे आगामी काळामध्ये या दोघातील संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाअंतर्गत जोरदार गटबाजी सुरू असुन हिंगोली विधानसभा क्षेत्राच्या आगामी उमेदवारीसाठी विद्यमान आमदार तथा जिल्हाध्यक्ष तानाजी मुटकुळे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी जोरदार कंबर कसली आहे. भाजप नेते रामरतन शिंदे यांनी उमेदवारीच्या दिशेने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. चार वर्षाचा कामकाजाचा लेखाजोखा मांडण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार तानाजी मुटकुळे यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना दिलेल्या पत्रातील गावांची नावे विकासनिधी मंजुर करुन आणल्याचे सांगितले. तसेच रामरतन शिंदे हे याच कामांची मंजुरी आणल्याचे सांगत सुटले असुन प्रसिध्दीचा खटाटोप करत असल्याचेही मुटकुळेंच्या बोलण्यातुन समोर आले.

मुटकुळेंच्या यादीत केसापुर, कडती, देवठाणा, वडद, मोप, कडोळी, सुलदली, सुरजखेडा, गोरेगाव, ताकतोडा, खंडाळा, कनेरगाव नाका, फाळेगाव, भिंगी, वरुड चक्रपान, सिंनगी नाका, कहाकर खुर्द, हाताळा, कोंडवाडा, कोंढा, सुकळी खुर्द, गिल्लोरी या हिंगोली व सेनगाव तालुक्यातील गावातील समाजमंदिर व सिमेंट रस्त्याच्या कामासाठी निधी आणल्याचा समावेश आहे. तर पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या माध्यमातुन भानखेडा, गणेशपुर, खांबाळा, बोराळावाडी, जवळा, गिलोरी, सिंनगी नागा, म्हाळसापुर ही सेनगाव व हिंगोली तालुक्यातील गावे तसेच औंढा, कळमनुरी व वसमत तालुक्यातील अन्य गावांसाठी सिमेंट रस्ता, संरक्षण भिंत, स्मशानभुमी शेड, ग्रामपंचायत इमारत बांधकाम या कामांचा समावेश माझ्या यादीत असल्याचे रामरतन शिंदे यांनी कागदपत्र पाठवुन सांगितले आहे. दरम्यान, या श्रेयवादाच्या लढाईत रामरतन शिंदे यांनी बाजी मारत खरेपणा समोर आणल्यामुळे त्यांचे जोरदार प्रयत्न दिसून येत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत