भाजप मुख्यालयात स्मशानशांतता; काँग्रेसचा जल्लोष

नवी दिल्ली : रायगड  वृत्त 

2014 मध्ये नरेंद्र मोदींचे सरकार प्रचंड बहुमतांनी सत्तेवर आल्यानंतर काही निवडणुकांचा अपवाद वगळता विजयाचा गुलाल उधळायची सवय लागलेल्या भाजप कार्यकर्त्यांना मोदी सरकारचा कार्यकाळ संपता संपता तोंड लपवून घरी बसण्याची पाळी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाने आज आणली. त्याच वेळी ज्या 24 अकबर रोड या काँगेस मुख्यालयाने गेली साडेचार वर्षे सुतककळा अनुभवली त्या काँग्रेस मुख्यालयाला पहिल्यांदाच रौनक प्राप्त झाली. भाजप मुख्यालयात स्मशानशांतता तर काँग्रेस कार्यालयात जल्लोष आणि देशाच्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत शुकशुकाटाचा माहौल असेच आज चित्र होते.

पाच राज्यांतील विधानसभांचे निकाल प्रतिकूल ठरतील अशी कुणकुण एक्झिट पोलनी व्यक्त केली होतीच. त्याच्याशी साधर्म्य सांगणारे निकाल लागल्यामुळे भाजपच्या गोटात स्मशानशांतता अनुभवायला मिळाली. मोदी हे ट्रम्पकार्ड आणि अमित शहांच्या तथाकथित मायक्रो मॅनेजमेंटमुळे आजवर विजयाचा गुलाल उधळत होते; पण या निवडणुकीत भाजपला तिन्ही राज्यांत काँग्रेसने कडवी झुंज देत पुनरागमन केले. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे पडसाद संसदेतही उमटले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांनी हे अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मीडियाशी बोलताना केले खरे. मात्र विधानसभा निकालाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मोदींनी काढता पाय घेतला. यावेळी पंतप्रधानांचा चेहरा साफ पडलेला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपची जबरदस्त पीछेहाट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आज राज्यसभेत उपस्थित असलेले भाजपाध्यक्ष अमित शहा बाहेर मीडियाचा ससेमिरा मागे लागेल म्हणून संसदेतील पक्षकार्यालयातच ठाण मांडून बसले होते. भूपेंद्र यादव व केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड यांच्याकडून ते अपडेटही जाणून घेत होते, मात्र यावेळी शहा यांच्या चेहऱयावरील अस्वस्थता लपून राहिली नाही.

मीडियाला चुकवता चुकवता मंत्र्यांची कसरत
विधानसभा निकालांचे ट्रेंड यायला लागल्यानंतर संसदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतरही भाजपची चांगलीच पीछेहाट होत असल्याने बाहेर जाऊन काय बोलायचे, या धास्तीने व मीडियाच्या भीतीपोटी अनेक मंत्र्यांनी आज संसदेतील कार्यालयातच ठाण मांडले, तर काही मंत्री संसदेचे मुख्य प्रवेशद्वार, राज्यसभेचे दोन नंबरचे गेट आणि बारा नंबरच्या गेटवर मीडियाचा ताफा असल्याचा अंदाज घेत जिथे मीडिया नाही अशा गेटवरून कलटी मारण्याच्या कसरती करताना दिसले.

भाजप मुख्यालयात स्मशानशांतता..
2014 नंतरच्या जवळपास प्रत्येक निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळत, ‘मोदी मोदी…’ अशा घोषणा देत मिठाई वाटत फटाक्यांची आतषबाजी अंगवळणी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांना आज निवांत घरीच बसण्याची पाळी विधानसभा निकालाने आणली. एरवी भाजप मुख्यालयात देशभरातील कार्यकर्त्यांची गर्दी, भलामोठा मंडप, निकालानंतर पंतप्रधान मोदींचे विजयी आवेशात होणारे आगमन आणि त्यांच्यावर होणारी पुष्पवृष्टी आणि त्यानंतर मोदी विजयी मुद्रेत कार्यकर्त्यांना ‘भाई और बहनौ…’ अशा शब्दांत संबोधित करणार. या पंरपरेला आजच्या निकालाने करकचून ब्रेक लावला. आज कोणीही बडा नेता भाजप मुख्यालयाकडे साधा फिरकलाही नाही.

कामकाज दिवसभरासाठी तहकूब
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, केंद्रीय मंत्री अनंतकुमार, खासदार भोलासिंग यांना श्रद्धांजली वाहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. लोकसभेत सभापती सुमित्रा महाजन यांनी अटलजींच्या कार्याचा गौरव करताना शोकप्रस्ताव मांडला, तर राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी अटलजींचे स्मरण करताना शोकप्रस्ताव ठेवला. दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

24 अकबर रोडवर आनंदाला उधाण
2014 पासून निव्वळ पराभवाची मातीच खायची सवय लागलेल्या काँग्रेसला आज खऱया अर्थाने अच्छे दिन आल्याचे चित्र काँग्रेस मुख्यालयांत दिसून आले. कर्नाटकात जेडीएससोबत सरकार आल्यानंतर काँग्रेस मुख्यायलयात थोडाफार जल्लोष दिसून आला. मात्र आजचा माहौल काही वेगळाच होता. फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटत काँग्रेसच्या यशाचा आनंद साजरा केला जात होता. राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली त्याला आज वर्ष पूर्ण होत असतानाच काँग्रेसने चमकदार कामगिरी केल्यामुळे गेली साडेचार वर्षे 24 अकबर रोडवर असलेले सुतकी वातावरण आज झटक्यात दूर झाल्याचे दिसून आले. ‘टूट गयी विकास की डोर, चलो काँग्रेस की ओर’ अशा आकर्षक घोषणांचे बॅनर्स काँग्रेस मुख्यालयात लक्ष वेधून घेत होते. काँग्रेसच्या विजयाचा अंदाज आल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी संसदेतून तातडीने दस जनपथकडे रवाना झाल्या तर राहुल गांधीही निवासस्थानी बसून निवडणूक निकालांचा आढावा घेत होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत