‘भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक संबंध जुनेच; नगरमध्ये फक्त उफाळून आले’

मुंबई : रायगड माझा वृत्त

‘नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीनं खेळलेल्या राजकारणाचा शिवसेनेला अजिबात धक्का बसलेला नाही. भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक राजकीय संबंध जुनेच असून महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात या संबंधांतून झाला आहे. अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त ते उफाळून आले इतकेच,’ अशी जहरी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अहमदनगर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला ‘कात्रजचा’ घाट दाखवून भाजपनं राष्ट्रवादीच्या साथीनं सत्ता मिळवली आहे. त्यामुळं शिवसेनेमध्ये संताप आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्ध ठाकरे यांनी आज या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. ‘बारा महिने तप केलं अन् गाढवासंगं पाप केलं…’ या कवितेच्या ओळींचा आधार घेऊन उद्धव यांनी भाजप, राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे…

>> राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगरला भाजपचा महापौर, उपमहापैर बसला आहे. राष्ट्रवादीने हा पाठिंबा बिनशर्त दिल्यामुळे दोघांचेही खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा दिसून आले.

>> २०१४ साली याच राष्ट्रवादीने भाजपला सरकार स्थापनेसाठी असाच बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. म्हणजे भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे व आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाच सांगत असतात. यानिमित्ताने दोघेही नागडे झाले आहेत व महाराष्ट्र त्यांच्यावर हसत आहे.

>> विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील त्यांच्या पुढार्‍यांना कवचकुंडले मिळवली व आता नगर महापालिकेत पाठिंबा देऊन केडगाव खून प्रकरणातील स्वतःच्या आमदारांना साफ करून घेतले. ही एक प्रकारे सौदेबाजीच म्हणावी लागेल.

>> एका बाजूला म्हणायचे शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. दोघांची विचारधारा हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होता कामा नये व दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीशी अनैसर्गिक, अनैतिक संबंध ठेवून सत्ताभोग घ्यायचा. खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे हे राष्ट्रवादीशी संबंध ठेवून भाजपने सिद्ध केले आहे.

>> कोडगेपणाचा कळस असा की, भाजपचे (‘ईव्हीएम गडबड’ फेम) मंत्री गिरीश महाजन म्हणतात, राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही विकासासाठी घेतला. मग तुमचे मुख्यमंत्री सिंचन घोटाळ्यातील आरोपींना ऊठसूट तुरुंगात पाठवण्याच्या धमक्या देतात ती सर्व जुमलेबाजीच म्हणावी काय?

>> नगरमध्ये त्यांना ईव्हीएम घोटाळे करणे जमले नाही. कारण हवा शिवसेनेची होती व ती स्पष्ट दिसत होती. भाजप खासदारांचे पुत्रही त्यांच्या घरच्या मैदानात शिवसेनेकडून पराभूत झाले.

>> नगरचे चित्र असे आहे की, सासरा भाजपात, तर जावई राष्ट्रवादीत, हे दोघे एकत्र आले. राष्ट्रवादी व भाजपचे लफडे नव्याने समोर आले. आता म्हणे राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांवर कारवाई होणार आहे. हे सर्व ढोंग आहे.

>> राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा त्या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना नगरमधील भाजप-राष्ट्रवादीच्या या ‘प्रकरणा’विषयी जराही कल्पना नव्हती असे आता सांगितले जात आहे. शरद पवार यांना माहिती होती की नाही हे त्यांचे त्यांनाच माहीत; पण नगरमधील ही ‘लोकशाही’ उद्या ‘बेबंदशाही’ होऊ शकते.

>> या निवडणुकीत काँग्रेस पक्षही तटस्थ राहिला म्हणे. राधाकृष्ण विखे-पाटलांचा हा जिल्हा; पण त्यांचेही आतून कीर्तन वरून तमाशा असेच सुरू असते. राष्ट्रवादीच्या पायात त्यांचीही टांग आहेच. भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत